Swanandi Tikekar and Ashish Kulkarni : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक आशिष कुलकर्णी हे दोघे डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. यांचा विवाहसोहळा पुण्यात पार पडला होता. स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे.
स्वानंदी आणि आशिष या दोघांनी नुकतीच ‘द अनुरुप शो’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी या दोघांनी लग्नानंतरचा एक अनोखा किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. लग्नानंतर सुनेचा सासरी परंपरेनुसार गृहप्रवेश केला जातो हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, स्वानंदीच्या आई-बाबांनी अनोखा निर्णय घेत मोठ्या प्रेमाने लाडक्या जावयाचा गृहप्रवेश केला होता.
आशिष कुलकर्णी हा किस्सा सांगताना म्हणतो, “काकू मला म्हणाल्या, स्वानंदीचा गृहप्रवेश तुम्ही करालच पण, आम्हाला तुझाही गृहप्रवेश करायचा आहे. कारण, आमची एकुलती एक मुलगी आहे. आमची मुलगी आम्ही कोणाला तरी दिली यापेक्षा आमच्या घरी एक मुलगा आला अशी भावना आमच्या मनात आहे. त्यामुळे आमच्या घरी आम्ही तुझं मनापासून स्वागत करणार…यानंतर मी आणि स्वानंदी यांच्या पुण्याच्या घरी गेलो. त्यांनी सगळ्यात आधी आम्हा दोघांचं औक्षण केलं. त्यानंतर मग आरती काकूंनी मला एक छान गाणं गायला सांगितलं.”
स्वानंदी याबद्दल सांगताना पुढे म्हणाली, “आईने गाणं गायला सांगितलं कारण, लग्न ठरल्यापासून, आमचं लग्न होईपर्यंत तिच्यासमोर याने एकही गाणं गायलं नव्हतं. तोच त्याचा गृहप्रवेश होता.”
“जेव्हा काकूंनी स्वागतासाठी मला घरी बोलावलं तेव्हा मी त्यांच्यासमोर पहिल्यांदा गाणं गायलो. त्याचा व्हिडीओ सुद्धा आम्ही सोशल मीडियावर शेअर केला होता. सर्वांनाच ते गाणं खूप आवडलं…मी तेव्हा ‘पाहिले न मी तुला’ हे गाणं गायलं होतं.” असं आशिष कुलकर्णीने सांगितलं.
दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याशिवाय आशिष कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम गायक आणि गीतकार आहे.