Star Pravah Nashibvan Serial Starring Adinath Kothare : छोट्या पडद्यावरील प्रत्येक मालिकांमध्ये टीआरपीच्या दृष्टीकोनातून नवनवीन बदल केले जातात. अनेकदा वाहिन्यांकडून काही जुन्या मालिका ऑफ एअर करण्याचा निर्णय घेण्यात येतो. तर, काही वेळा लोकप्रिय कलाकारांच्या साथीने नव्या मालिका लॉन्च केल्या जातात. सध्या ‘स्टार प्रवाह’च्या अशाच एका मालिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यामागे कारणही खास आहे…ते म्हणजे लोकप्रिय अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा आदिनाथ कोठारे आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकणार आहे.
आदिनाथ त्यांच्याच कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘नशीबवान’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. त्याच्या पात्राचं नाव आहे रुद्रप्रताप घोरपडे. आदिनाथसह नेहा नाईक, सोनाली खरे, अजय पूरकर, प्राजक्ता केळकर हे दमदार कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
‘नशीबवान’च्या नव्या प्रोमोमध्ये घोरपडे कुटुंबीयांच्या घरी कामानिमित्त गिरीजा येते. रुद्रप्रताप ( आदिनाथ ) पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो असं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. यानंतर त्याची आत्या ( सोनाली खरे ) त्याला टोमणे देखील मारते आणि यंदा मानाचा मोदक नेमका कोणाला मिळणार याची सगळे आतुरतेने वाट पाहत असतात.
रुद्रप्रताप एक उकडीचा मोदक उचलतो आणि प्रसाद म्हणून गिरीजाच्या हातावर ठेवतो. तर, ताटातील दुसरा मोदक नागेश्वर घोरपडे उचलतात. दरवर्षी मानाचा मोदक ( ज्यात नाणं लवपवलेलं असतं ) नागेश्वर यांना मिळत असतो. पण, रुद्रप्रतापने प्रसाद म्हणून गिरीजाला दिलेल्या मोदकात यंदा नाणं आढळतं. आता यामुळे नागेश्वर यांना संताप अनावर होतो. आता यानंतर रुद्रप्रताप आणि गिरीजाच्या आयुष्यात काय वादळ येणार हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.
रुद्रप्रताप घोरपडेच्या रुपात आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रुद्रप्रताप घोरपडे हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा. दिसायला रुबाबदार.. जणू एखादा राजकुमार. स्वभावाने मनमिळावू, सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे. वडिलांचा मोठा बिझनेस असल्याने रुद्रला परदेशी पाठवण्याची त्याच्या वडिलांची म्हणजेच नागेश्वरची इच्छा होती. पण रुद्रने गावात राहून गावातल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ही मालिका येत्या १५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिनाथला मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.