Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत लवकरच एक रंजक वळण येणार आहे. हा ट्विस्ट नेमका काय आहे याचा खुलासा वाहिनीने ‘पारू’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो शेअर करत केला आहे. मालिकेच्या आगामी भागात आदित्य पारूच्या जीवाच्या रक्षणासाठी खडतर व्रत पूर्ण करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

पारूच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुरुजी तिच्या वडिलांना देतात. लेकीच्या जीवाला धोका असल्याचं ऐकताच मारूतीला अश्रू अनावर होतात. यावर गुरूजी मारूतीला सांगतात, “हे सर्व आपण टाळू शकत नाही…त्यामुळे माझ्याशी वाद घालून काहीच उपयोग होणार नाही.” मारुतीला यानंतर आपल्या लेकीची प्रचंड काळजी वाटू लागते. पारूच्या रक्षणासाठी आपण काहीही करायला तयार आहोत असं मारुती गुरुजींना सांगतो. यानंतर गुरुजी त्याला एक खडतर व्रत पूर्ण करण्यास सांगतात.

आता मालिकेच्या आगामी भागात मारुती पारूसाठी हे व्रत पूर्ण करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मारुतीला पारूला उचलून घेऊन डोंगरावर असलेल्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचं असतं असं पाहायला मिळत आहे. मात्र, हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाहीये…पारूला उचलून एवढ्या लांब जाणं मारुतीला वयोमानानुसार झेपत नाही…इतक्यात आदित्य तिथे पोहोचतो आणि पारूला वेळीच सावरतो असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आता मारुतीचं व्रत आदित्य पूर्ण करणार आहे. “तुझ्यासाठी हे व्रत मी नक्की पूर्ण करेन” असा विश्वास तो पारूला देतो. आता आदित्यची आपल्या प्रेमासाठी खरी अग्निपरीक्षा देण्याची वेळ आलीये. त्यामुळे यामध्ये त्याला यश येईल का? पुढे आदित्य-पारूच्या नात्याचं भवितव्य काय असेल याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पारू’ मालिकेत आदित्यच्या अग्निपरीक्षेचा विशेष भाग प्रेक्षकांना ३० आणि ३१ मे रोजी पाहायला मिळणार आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘पारू’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये शरयू सोनावणे ( पारू ) आणि प्रसाद जवादे ( आदित्य ) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.