Aishwarya & Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचे हटके रील्स व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. मराठी सिनेविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून या दोघांना ओळखलं जातं. मराठी मालिका, सिनेमा, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये या जोडप्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता अभिनयाच्या साथीने ऐश्वर्या व अविनाश नारकर सोशल मीडियावर देखील तेवढेच सक्रिय असतात.

ऐश्वर्या-अविनाश यांचे डान्स व्हिडीओ असो किंवा मजेशीर रील्स यामुळे चाहत्यांचं नेहमीच भरभरून मनोरंजन होतं. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मिळून ‘पल्लो लटके’ या राजस्थानी गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत, या जोडप्याच्या एनर्जीचं विशेष कौतुक केलं होतं. आता या जोडप्याचा आणखी एक भन्नाट कॉमेडी व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अविनाश नारकर यांची रागात एन्ट्री होते आणि ते बायकोला जाब विचारतात, “अगं ए कपडे, भांडी, कचरा काढणं, लादी पुसणं ही चारही कामं बाकी आहेत, ही कामं कोण करणारे आज?” ऐश्वर्या यावेळी प्रचंड शांत असतात. त्या अविनाश नारकरांचा हात पकडतात आणि बॅकग्राऊंडला ‘सन ऑफ सरदार २’मधील “पहला तू, दूजा तू, तीजा तू, चौथा तू” हे गाणं वाजतं. अभिनेत्री नवऱ्याचा हात पकडून या गाण्यातील व्हायरल हूकस्टेप करतात.

“घरातील चार काम कोण करणार?” असा अविनाश यांचा मूळ प्रश्न असतो यावर ऐश्वर्या “पहला तू, दूजा तू…” या गाण्याची हूकस्टेप करून उत्तर देतात आणि चारही कामं तुम्हालाच करावी लागणार आहेत असं नवऱ्याला सूचित करतात. अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘घरोघरी मातीच्या चुली’ असं भन्नाट कॅप्शन दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांचं हे हटके रील सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. अपूर्वा गोरे, तितीक्षा तावडे, सुरुची अडारकर या मराठी अभिनेत्रीने ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी “या गाण्याचा खरा अर्थ आज समजला”, “तुम्ही दोघंही आदर्श जोडी आहात”, “तुम्ही भारी आहात कमाल…” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.