Aishwarya Narkar Photoshoot : मनोरंजन विश्वातील सगळ्याच अभिनेत्री सौंदर्यासह फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसतात. ऐश्वर्या नारकरांनी नुकतीच वयाची पन्नाशी ओलांडली आहे तरीही त्यांचा फिटनेस अलीकडच्या तरुणाईला लाजवेल असाच आहे. अभिनेत्री रोज सकाळी उठून योगा करतात; दैनंदिन दिनचर्येचे व्हिडीओ अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.
याशिवाय ऐश्वर्या यांच्या फोटोशूटची सुद्धा सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगते. कधी पारंपरिक तर, कधी वेस्टर्न लूकमध्ये त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात. मात्र, अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका फोटोशूटची सध्या चर्चा होताना दिसतेय. या फोटोमध्ये ऐश्वर्या नारकरांनी प्लाजो पॅन्ट आणि हॉल्टर नेक बॅक ओपन क्रॉप टॉप घातल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा हा वेस्टर्न लूक पाहून अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोशूटवर नकारात्मक, वाईट कमेंट्स केल्या होत्या.
ऐश्वर्या नारकरांचं फोटोशूट पाहून काही नेटकऱ्यांनी “ताई आपली संस्कृती जपा, तुम्हाला हे शोभत नाही” अशाप्रकारच्या असंख्य कमेंट्स केल्या आहेत. यावेळी ऐश्वर्या नारकरांच्या चाहत्यांनीच या ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
अभिनेत्रीच्या चाहत्यांनीच सुनावलं…
“ताई आपली संस्कृती विसरू नका” असं सांगणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांच्या एका चाहत्याने, “मॅडम छान दिसत आहेत…तुमचे विचार छोटे आहेत, त्यांचे कपडे नाहीत” असं प्रत्युत्तर दिलं आहे.
याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी, “हिंदीतल्या हिरोइनचं कौतुक करता आणि मराठी अभिनेत्रींनी काही केलं की उलटसुलट बोलता…हे योग्य नाही”, “धमक असेल तर त्यांच्यासारखा फिटनेस जपून दाखवा”, “निगेटिव्ह कमेंट्स करणारे स्वतः काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत स्वतः लपून छपून काय-काय बघत असतील आणि करत असतील”, “मराठी कलाकारांना वाईट ठरवारे तुम्ही कोण? स्वत:कडे बघा आधी” अशाप्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये ऐश्वर्या नारकरांच्या चाहत्यांनीच ट्रोलर्सला खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेनंतर ऐश्वर्या कोणत्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.