Aishwarya Narkar Home Tour : ‘दुहेरी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘स्वामिनी’, ‘या सुखांनो या’, ‘श्रीमंतांघरची सून’, ‘रेशीमगाठी’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या नारकर. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दैनंदिन फिटनेस व्हिडीओ, अविनाश नारकरांबरोबरचे मजेशीर रील्स, वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स अभिनेत्री त्यांच्या चाहत्यांबरोबर नेहमीच शेअर करत असतात.
ऐश्वर्या नारकरांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या घराची झलक दाखवली आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची घरं कशी आहेत हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. ऐश्वर्या यांनी ‘Home’ असं कॅप्शन देत त्यांच्या घराचा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला प्रशस्त हॉल पाहायला मिळतो. याशिवाय घरातील बऱ्याच कोपऱ्यांमध्ये शोभिवंत झाडं ठेवण्यात आली आहेत. यामुळेच अभिनेत्रीच्या घराची पहिली झलक पाहताच मन प्रसन्न होतं. घरातील स्टडी टेबल, सर्वत्र वावरणारी मांजर यांसह ऐश्वर्या यांच्या बाल्कनीतून दिसणारा सुंदर व्ह्यू सर्वांचं लक्ष वेधून घेतो. घरातील एका भिंतीवर अभिनेत्रीचे सुंदर फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये अविनाश व ऐश्वर्या यांचा ट्रेडिशनल लूकमधील फोटो देखील आहे.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरातील मोठ्या हवेशीर खिडक्या, छोटी शोभिवंत झाडं, आकर्षक इंटिरियर आणि प्रशस्त खोल्यांची झलक पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्रीच्या घरातील सुंदर असा झोपाळा देखील विशेष लक्ष वेधून घेतो. ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या या सुंदर घराची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तुमचं घर किती सुंदर आहे”, “मॅम…खरंच सुंदर”, “लहान-लहान झाडं आणि तुमच्या घरातील मांजर घर असावं तर असं”, “सुंदर आशियाना”, “वॉव…खूप सुंदर घर आहे”, “खरंच एक नंबर घर आहे” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका संपल्यावर अभिनेत्री कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.