Aishwarya Narkar Launch New Clothing Brand : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने छोट्या पडद्यावर जवळपास २ वर्षे अधिराज्य गाजवलं. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मालिका सुरू झाल्यावर काही महिन्यांनी यामध्ये ‘का रे दुरावा’ फेम सुरुची अडारकरची एन्ट्री झाली होती. हळुहळू या मालिकेच्या सेटवर ऐश्वर्या, तितीक्षा आणि सुरुची यांच्यात खूप छान मैत्री झाली. या अभिनेत्री मालिका संपल्यावरही एकत्र भेटत असतात. नुकतीच या तिघींनी आपल्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर या ऑनस्क्रीन अभिनेत्रींनी ऑफस्क्रीन एकत्र येऊन नवीन व्यवसाय सुरू केला आहे. या तिघींनी स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लॉन्च केला आहे. ही आनंदाची बातमी या तिघींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडओ शेअर करत सर्वांना सांगितली आहे.
ऐश्वर्या, तितीक्षा आणि सुरुची यांच्या नव्या क्लोथिंग ब्रँडचं नाव आहे ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’. याविषयी माहिती देताना या तिघीही पुढे सांगतात, “हाय… आजवर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांतून बघत आलेले आहात. विविध मालिकांमध्ये तुम्ही आम्हाला पाहिलंय आणि आमच्यावर तुम्ही कायम भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर एक आनंदाची बातमी शेअर करतोय… आज आम्ही आमचा ब्रँड लॉन्च करत आहोत. आमच्या ब्रँडचं नाव आहे ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’. आम्ही खास तुमच्यासाठी खूप सुंदर साड्या घेऊन येत आहोत…आणि या सगळ्या साड्या तुम्हाला आमच्या ब्रँडच्या पेजवर पाहायला मिळतील.”
दरम्यान, मालिकेत एकत्र काम केल्यावर आता खऱ्या आयुष्यात सुद्धा मैत्री जपून एकत्र नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या या अभिनेत्रीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ऐश्वर्या, सुरुची आणि तितीक्षा या तिघींनाही त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी त्यांचे मित्रमंडळी, चाहते तसेच मराठी कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अनघा अतुल, शर्मिला शिंदे, एकदा डांगर यांनी कमेंट्स व इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत या तिघींचंही कौतुक केलं आहे.