Aishwarya Narkar Recipe Video : श्रावण महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर यांसारखे महत्वाचे सण या महिन्यात येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांत विविध पदार्थ बनवले जातात. मासवडी, पुरणपोळ्या, मोदक, पातोळ्या या पदार्थांची नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. सणवाराला अळुवड्या सुद्धा आवर्जून बनवल्या जातात. मात्र, अळुवड्या बनवण्याची पारंपरिक पद्धत प्रत्येकालाच माहितीय असं नाही, तर काही गृहिणींना या वड्या बनवणं जमतही नाही. त्यामुळेच लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी अळुवड्या बनवण्याची साधी-सोपी रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यामांमुळे ऐश्वर्या नारकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने करिअरप्रमाणे आपल्या घरची जबाबदारी सुद्धा उत्तमप्रकारे सांभाळली. ऐश्वर्या यांचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे. यावर त्या विविध पदार्थांच्या रेसिपीज, व्यायाम, योगाचे व्हिडीओ शेअर करत असतात.

ऐश्वर्या नारकरांनी नुकताच व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांना अळुवड्यांची रेसिपी सांगितली. अळुवड्या बनवताना अभिनेत्रीने बेसन पीठाऐवजी मुगाच्या डाळीच्या आणि तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. यामुळे वड्या कुरकुरीत होतात असं अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

ऐश्वर्या नारकरांचा रेसिपी व्हिडीओ

ऐश्वर्या नारकर म्हणतात, “आज मला अवीने वडीचं अळू आणून दिलं होतं. त्यामुळे मला अळूवड्या करायच्या आहेत. आम्ही वड्या बनवताना चण्याच्या डाळीचं पीठ वापरत नाही, मुगाच्या डाळीचं पीठ वापरतो. यासाठी आपल्याला चिंचगुळाचा कोळ बनवून घ्यावा लागेल. सुरुवातीला मुगाच्या डाळीचं पीठ आणि थोडंस तांदाळाचं पीठ घ्या. तांदळाच्या पीठामुळे अळुवड्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. या पीठात आपण लाल-तिखट, हळद, धने-जिरे पावडर, मीठ, चिंचेचा कोळ घालणार आहोत. यानंतर थोडं पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या. पीठ छान मिक्स करा. अळूच्या पानांचे देठ व्यवस्थित काढा.”

“अळुच्या पानांना तयार केलेलं पीठाचं सारण लावा. यानंतर एकावर एक पानं ठेवून त्याचा छान रोल करा. यानंतर तुम्ही तयार केलेले रोल २० मिनिटं कूकरची शिट्टी काढून उकडवून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या मध्यम आकाराच्या वड्या कापा आणि या वड्या तळून घ्या. अशाप्रकारे झाल्या तुमच्या गरमागरम अळुवड्या तयार!” अशी रेसिपी ऐश्वर्या यांनी या व्हिडीओमध्ये सांगितली आहे.

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर अभिनेत्री सुरुची अडारकरने “मला वडी हवीये” अशी कमेंट करत त्यांच्या रेसिपीचं कौतुक केलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी “ये खायला…” असं म्हटलंय. तर, काही नेटकऱ्यांनी “ताई पुढच्यावेळी यात तीळ आणि ओवा सुद्धा घाला म्हणजे अजून छान होईल” असा सल्ला अभिनेत्रीला दिला आहे.