Aishwarya Narkar : घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या सणाला बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक घराघरांत नैवेद्यासाठी बनवले जातात. ज्या गृहिणींना उकडीचे मोदक बनवता येत नाही किंवा या गणेशोत्सवात ज्यांना हे मोदक बनवायला शिकायचे आहेत अशा सगळ्या चाहत्यांनी ऐश्वर्या नारकरांनी खास मोदकाची रेसिपी शेअर केली आहे.
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, याशिवाय त्यांचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे. या माध्यमातून त्या विविध रेसिपीज चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.
ऐश्वर्या नारकरांनी नुकतेच उकडीचे मोदक बनवले होते. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. २० ते २१ मोदक बनवण्यासाठी काय-काय साहित्य लागतं, ते कसे बनवायचे याची संपूर्ण रेसिपी त्यांनी त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितली आहे.
ऐश्वर्या नारकरांनी बनवले उकडीचे मोदक
- साहित्य : २ वाट्या किसलेला नारळ, किसलेला गूळ १ ½ कप, साजूक तूप – १ टेबलस्पून, वेलची पावडर – ½ टीस्पून, काजू/बदाम/किशमिश – थोडेसे (इच्छेनुसार)
- उकड काढण्यासाठी २ कप तांदळाचं पीठ, पाणी २ ½ कप, मीठ – चिमूटभर
मोदक बनवण्याची कृती
- कढईत तूप गरम करून त्यात गूळ टाका.
- गूळ छान वितळल्यावर त्यात किसलेला नारळ घाला.
- गूळ व नारळ छान एकत्र मिक्स करून हलकं परतून घ्या.
- मिश्रण थोडे घट्ट झाले की वेलची पावडर आणि सुकामेवा टाकून गॅस बंद करा.
- सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. दुसरीकडे मोदकाची उकड तयार करायला घ्या.
- एका पातेल्यात पाणी, मीठ व तूप उकळा.
- उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवा.
- दोन मिनिटांनी गॅस बंद करून पीठ नीट एकजीव होईपर्यंत ढवळा.
- गरम असतानाच हाताला थोडं तूप लावून उकड मऊसर मळून घ्या.
- यानंतर उकडीचे लहान-लहान गोळे करा. त्याचे सारण भरून मोदक वळा. ज्यांना मोदक हातावर वळता येत नाहीत, ते लोक मोदकाचा साचा वापरू शकतात.
- इडली पात्रात किंवा मोदक पात्रात पानं (केळीची पाने असल्यास उत्तम) लावा. १०–१२ मिनिटे वाफवून घ्या.
महत्त्वाची टीप
उकड गरम असतानाच पीठ मळल्यास मोदकाची कडा गुळगुळीत होते.
दरम्यान, मोदकाची रेसिपी इतक्या सुंदर पद्धतीने शेअर केलेल्यामुळे सर्वजण अभिनेत्रीचं भरभरून कौतुक करत आहेत. “खूप सुंदर मोदक केलेत”, “किती छान”, “सुगरण आहेस ताई” अशा प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडीओवर आल्या आहेत.