Akshay Kelkar Get Married Soon : बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणजेच अभिनेता अक्षय केळकर हे नाव आता घराघरांत पोहोचले आहे. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे त्याचं आयुष्यचं बदललं. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षयने त्याचं नाव कोरलं आणि या शोमुळे आणखीनच लोकप्रिय झाला. या शोमध्ये आणि काही मुलाखतींत अक्षयने त्याच्या आयुष्यातील रमाचा उल्लेख केला होता. पण ही रमा नेमकी कोण? याबद्दल त्याने सांगितलं नव्हतं. अशातच २३ डिसेंबर २०२४ रोजी त्याने त्याच्या आयुष्यातील रमाला सर्वांसमोर आणलं. ही रमा म्हणजे साधना काकतकर.
गेल्या वर्षी अक्षयने त्याची गर्लफ्रेंड रमाबद्दल जाहीर प्रेमाची कबुली देत लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं आहे. अशातच आता अक्षयच्या घरी लग्नाची लगबग झाली सुरू झाली आहे. अक्षय केळकर गायिका साधना काकतकरबरोबर लवकरच लग्न करणार आहे आणि यानिमित्त त्याची लगीनघाई सुरू आहे. अक्षय हा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याचबरोबर युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातूनही तो त्याच्या आयुष्यातील घडामोडीही चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच अक्षयने त्याच्या युट्यूबर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षय त्याच्या लग्नाची पहिली लग्नपत्रिका घेऊन कुलदेवतेला अर्पण करण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये असलेल्या कुलदेवता दालभेश्वराचे दर्शन घेऊन तिथे त्याने लग्नाची पत्रिका ठेवली. अभिनेता त्याच्या आईसह कोकणात पत्रिका घेऊन गेला होता आणि या खास क्षणांची झलक त्याने त्याच्या युट्यूब व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अक्षयने असं म्हटलं आहे की, “लग्नाच्या शुभकार्याची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने व्हावी, यासाठी पहिली पत्रिका देवाला अर्पण केली जाते. सर्व काही सुरळीत पार पडावे यासाठी पत्रिका देवाला अर्पण करून आपण आपल्या संकल्पाची माहिती देवाला देतो आणि या आनंदाच्या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणूनच आम्हीसुद्धा आमच्या श्री दालभेश्वर, दाभोळ इथे असलेल्या कुलदेवतेला पत्रिका देत लग्नाचे आमंत्रण दिले.”
दरम्यान, काही दिवसांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली. या खरेदीचा व्हिडीओही त्याने शेअर केला होता. या खरेदीनंतर अक्षय त्याच्या गावी गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये असलेल्या कुलदेवता दालभेश्वराचे दर्शन घेऊन तिथे त्याने लग्नाची पत्रिका ठेवली आहे. यावरुन हे दोघे आता काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे अक्षय आणि साधना यांच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.