Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलीव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. अलीकडेच त्यामध्ये एका नवीन कुटुंबाची एन्ट्री झाली. मालिकेचे निर्माते असित मोदींनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत माहिती दिली. परंतु, सध्या या मालिकेत महत्त्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. गोकुळधाम सोसायटीत सर्व जण एकत्र मिळून-मिसळून राहताना दिसतात. या मालिकेत अनेक वेगवेगळी पात्रे पाहायला मिळतात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतली, अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत कोमल हाथी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रांजणकर ही काही भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळाली नसल्याने तिने ही मालिका सोडली की काय अशा स्वरूपाच्या चर्चा होत आहेत. त्याबाबत स्वत: अभिनेत्रीने प्रतिकिया दिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल अभिनेत्री अंबिका रांजणकरची प्रतिक्रिया
अंबिका रांजणकरने ‘टेली चक्कर’शी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली आहे. अंबिकाने मालिका सोडल्याच्या चर्चा खोट्या ठरवीत सांगितलं, “मी मालिकेतून एक्झिट घेतलेली नाहीये. मी ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’चा भाग आहे.” मालिकेत ती काही दिवस पाहायला मिळत नसल्याने या चर्चा सुरू होत्या. त्याबद्दल ती म्हणाली, “काही वैयक्तिक कारणांमुळे मी बाहेर होते. मला स्वत:साठी वेळ हवा होता.”
अंबिकाने ती मालिका सोडत नसल्याचे सांगितल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला. अभिनेत्री ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अनेक वर्षांपासून कोमल हे पात्र साकारत आहे. गेली १७ वर्षे ती या मालिकेचा भाग आहे. त्यातील प्रत्येक पात्राचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तसाच कोमल या पात्राचाही चाहतावर्ग आहे. कोमल व हंसराज हाथी ही जोडी या मालिकेतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार जुलै २०२४ मध्ये या मालिकेत कोमलच्या मुलाची म्हणजेच गुलाबकुमार ही भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाहने तो मालिकेतून एक्झिट घेत असल्याचे सांगितले होते. कुश अगदी सुरुवातीपासून या मालिकेचा भाग होता. परंतु, १६ वर्षे सलग या मालिकेत काम केल्यानंतर त्याने यातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नुकतीच चार नवीन कलाकारांची एन्ट्री झाली असून, गोकुळधाम सासायटीमध्ये नवीन कुटुंब राहायला आले आहे. त्यामुळे आता मालिकेत कोणते नवीन वळण येणार, या कुटुंबाच्या येण्याने प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार, तसेच ही नवीन पात्रे कशी असतील हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल.