Ankita Lokhande Pen’s A Heartfelt Note for Her Late Father : अंकिता लोखंडे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री कुठल्या न कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. अशातच आता नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या वडिलांच्या आठवणीत ही पोस्ट केली आहे.

अंकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती व तिचा नवरा विकी जैन अनेकदा सोशल मीडिया मार्फत एकमेकांबरोबरचे तसेच कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात. अशातच अभिनेत्रीने वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने तिच्या आई-वडिलांबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.

अंकिता लोखंडेची वडिलांसाठी भावुक पोस्ट

अंकिता वडिलांसाठी पोस्ट शेअर करत म्हणाली, “काही जखमा कधीच भरून निघत नाही. तुम्ही फक्त त्याबरोबर जगत असता. तीन वर्षे झाली पण अजूनही सगळं तसंच आहे. तुमच्यासारखे वडील मला मिळाले यासाठी मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही माझे हिरो होतात, तुम्ही माझे मित्र होतात, तुम्ही माझा सगळ्यात मोठा आधार होतात. आता आमच्याकडे फक्त आठवणी उरल्या आहेत; पण त्यांच्या आशीर्वादाबरोबर मी पुढे जात राहीन.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझे वडील होण्यासाठी धन्यवाद. मी, अर्पण आणि आई आम्हाला तुमची खूप आठवण येते. असा एक ही दिवस नसतो, जेव्हा आम्हाला तुमची आठवण आलेली नसते.” अंकिता पुढे म्हणाली, “ज्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे, त्यांनी लक्षात ठेवा दु:ख कधीच कमी होत नाही, आपण त्याबरोबरच पुढे जात असतो.”

अंकिता लोखंडेच्या वडिलांचं शशिकांत लोखंडे यांचं २०२३ मध्ये निधन झालं होतं. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलांविषयी बोलताना दिसते. आता अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान, अंकिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकतीच ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमात झळकली होती. यामध्ये ती तिच्या नवऱ्यासह सहभागी झाली होती. यापूर्वी अभिनेत्री ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटातून झळकलेली. यासह तिने काही बॉलीवूड चित्रपटांतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीने ‘बिग बॉस’मध्येही भाग घेतला होता. परंतु, ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ते ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमळेच.