‘बिग बॉस १७’ पर्व चांगलेच गाजले. प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी ‘बिग बॉस १७’ चा विजेता ठरला. यंदा बिग बॉसमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनबरोबर सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच अंकिता व विकीच्या नात्यात चढ-उतार बघायला मिळाला होता. एवढचं नाही तर अंकिता व तिच्या सासूमध्येही बिनसल्याचे समोर आले होते.

यंदाचे ‘बिग बॉस’चे पर्व खेळापेक्षा वादामुळेच चर्चेत राहिले. ‘बिग बॉस’च्या घऱात दररोज अंकिता व विकीमध्ये टोकाची भांडणे होताना बघायला मिळाली होती. या वादामुळे अनेकदा दोघांनी नातं तोडण्याबाबतही वक्तव्य केले होते. अंकिताच्या आईपासून सलमान खानपर्यंत अनेकांनी दोघांची समजूत काढली होती. मात्र, त्याचा काहीच फायदा झालेला दिसून आला नाही. दिवसेंदिवस दोघांमधील वाद वाढतच चालले होते. दोघांमधील वाढते वाद पाहता सलमान खानने अंकिताला नातं टिकवण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. नुकतेच अंकिता व विकी भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी तिने सलमानने दिलेल्या सल्ल्याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- अनुप सोनीने ‘क्राईम पेट्रोल’ का सोडलं? अभिनेता स्पष्टच बोलला; म्हणाला, “मी फार अस्वस्थ…”

अंकिता म्हणाली, “बिग बॉस संपल्यानंतर मी जेव्हा सलमान खानला भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी मला तू आणि विकी आता आई-बाबा व्हा असा सल्ला दिला होता. सलमान सरांनी दिलेला हा सल्ला ऐकून मला आश्चर्य वाटले. पण त्यांचे म्हणणे असे होते की, मुलांचा जन्म झाल्यानंतर नवरा-बायको जास्त जवळ येतात.”

अंकिता व विकीमधील वाद पाहता ‘बिग बॉस’ संपल्यानंतर अंकिता व विकी वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता परिस्थिती निवळली असून अंकिता व विकी पुन्हा एकत्र आल्याचे बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अनेकांनी अंकिता व विकीला त्यांच्या भांडणावरून ट्रोलही केले होते. दरम्यान, एका मुलाखतीत अंकिताने अशा ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले होते.

Story img Loader