Pahalgam Terror Attack: २२ एप्रिलला देशात खळबळ उडवणारी घटना घडली. गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झाला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. त्यामुळे २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. तसंच अनेकजण जखमी झाले. या हल्ल्याला नऊ दिवस उलटले असून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा वाढत चालला आहे. भारत सरकार सतत पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करताना दिसत आहेत. बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं. शिवाय पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घातली.

तसंच भारतीय कलाकार देखील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. आमिर खानने ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पुढे ढकलला. तसंच बादशाह, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल यांनी आपले लाइव्ह कॉन्सर्ट रद्द केले. त्यानंतर आता अंकिता लोखंडेने देखील अशाच प्रकारे मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाच कौतुक केलं जात आहे.

हिंदी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने पहलगाम हल्ल्यानंतर तिचा यूएसए शो रद्द केला आहे. सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून अंकिताने हा निर्णय जाहीर केला आहे. अंकिताने लिहिलं आहे, “जड अंतःकरणाने मी हे सांगू इच्छितो की आम्ही आमचा आगामी यूएसए शो रद्द करत आहोत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि देश ज्या वेदनांमधून जात आहे ते लक्षात घेता, मला वाटते की, यूएसए दौऱ्याची ही योग्य वेळ नाहीये. माझ्या संवेदना आणि प्रार्थना प्रभावित झालेल्या कुटुंबांबरोबर आहेत. एक भारतीय म्हणून मी देशाबरोबर उभी आहे.”

पुढे अंकिताने लिहिलं, “हा यूएसए दौरा कायमचा रद्द झालेला नाही. आम्ही ते नंतरच्या तारखेसाठी पुन्हा शेड्यूल करू. या प्रेम, आपुलकी, पाठिंब्या आणि समजुतीबद्दल सर्वांचे आभार.’

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी सलमान खानने त्याचा युके दौरा रद्द केला होता. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, काश्मीरमधील अलीकडेच झालेल्या घटनेनंतर, जड अंतःकरणाने आम्ही ४ आणि ५ मे रोजी मँचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा ‘द बॉलिवूड बिग वन शो यूके’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसंगी वेळीच शो रद्द करणं, आम्हाला योग्य वाटलं.