Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर यंदा लग्नानंतर तिचा पहिला गणेशोत्सव साजरा करत आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी करण्यासाठी अंकिता देवबागला तिच्या माहेरी गेली होती. माहेरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यावर अंकिता व कुणाल अलिबागला निघाले.

अंकिता वालावलकरने यंदा फेब्रुवारी महिन्यात संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्न केलं. अंकिता कोकणातील असल्यामुळे गणेशोत्सव या सणाशी तिचं अत्यंत जवळचं नातं आहे. तसेच अंकिता घरातील मोठी मुलगी असल्याने ती स्वत: पुढाकार घेऊन बाप्पाच्या स्वागताची दरवर्षी तयारी करते. तर, दुसरीकडे कुणालच्या घरीसुद्धा गणपती असतो. त्यामुळे लग्नाआधीच अंकिताने नवऱ्याला काही झालं तर मला गणपतीसाठी माझ्या माहेरी जावं लागेल अशी अट घातली होती. कुणालने देखील आपण दोघं मिळून सगळं नीट मॅनेज करू असा शब्द बायकोला दिला होता.

माहेरी देवबाग येथे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून अंकिता व कुणाल दुपारी अलिबागच्या दिशेने रवाना झाले. आता अंकिताने माहेरच्या आणि सासरच्या गणपती बाप्पाबद्दल खास पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अंकिताची खास पोस्ट

अंकिता लिहिते, “माहेरचा गणपती करून आम्ही निघालोय आता घरी अलिबागला ..माहेरचा गणपती म्हणजे जन्मापासून जो आपल्या डोळ्यांसमोर आहे, लहानपणापासून ज्याच्या आरतीत, गोंधळात आपण वाढलो. त्या आठवणी, ती ऊब, ती जबाबदारी- म्हणजे माहेरचा गणपती.”

“आणि सासरचा गणपती? तो फक्त देव नसतो, तर तो आपलं नवीन आयुष्य, नवीन घर आणि नवीन नात्यांचा धागा बनतो. माहेरच्या आठवणींना सोबत घेत आपण जेव्हा सासरच्या गणपतीकडे जातो, तेव्हा खरंतर आपल्याला दोन घरांचा आशीर्वाद मिळतो. एक घर आपल्याला जन्म देणारं, आणि दुसरं घर आपल्याला स्वीकारणारं. म्हणूनच माहेरचा गणपती ही जबाबदारी असते, तर सासरचा गणपती हे नात्यांचं समाधान आणि पूर्णत्व असतं…आणि मी हे दोन्ही आयुष्यभर सांभाळेन” असं सांगत अंकिताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अंकिताने या पोस्टला ‘जमाई राजा राम मिला’ हे गाणं लावलं आहे. नेटकऱ्यांनी अंकिता व कुणालचं कमेंट्समध्ये भरभरून कौतुक केलं आहे.