Kokan Hearted Girl Aka Ankita Walawalkar : आज संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलीवूडसह मराठी सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरच्या कोकणातील देवबागच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे.

अंकिता वालावलकरने यंदा फेब्रुवारी महिन्यात संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्न केलं. अंकिता कोकणातील असल्यामुळे गणेशोत्सव या सणाशी तिचं अत्यंत जवळचं नातं आहे. तसेच अंकिता घरातील मोठी मुलगी असल्याने ती स्वत: पुढाकार घेऊन बाप्पाच्या स्वागताची दरवर्षी तयारी करते. तर, दुसरीकडे कुणालच्या घरीसुद्धा गणपती असतो. त्यामुळे लग्नाआधीच अंकिताने नवऱ्याला काही झालं तर मला गणपतीसाठी माझ्या माहेरी जावं लागेल अशी अट घातली होती. कुणालने देखील आपण दोघं मिळून सगळं नीट मॅनेज करू असा शब्द बायकोला दिला होता आणि दोन दिवसांपूर्वी अंकिता-कुणाल दोघंही जोडीने बाप्पाच्या स्वागतासाठी देवबागला पोहोचले आहेत.

अंकिता म्हणते, “सासरच्या गणपती बाप्पाची तयारी करून मी निघाले माहेरच्या गणपती बाप्पाची तयारी करण्यासाठी…आता सगळ्यांनाच माहितीये जेव्हा आम्ही लग्नाचं ठरवत होतो…तेव्हाच मी कुणालला म्हटलं होतं की, गणपतीचं काय? तेव्हा तो म्हणाला होता मी सुद्धा येईन आपण मिळून सगळ्या गोष्टी करूया. मुंबईहून गावी गेल्यावर आम्ही लगेच सजावट करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी गावच्या मार्केटमध्ये जाऊन मी बाकीचं सामान घेऊन आले.”

“आमचं राहतं घर हे १०० वर्षांपेक्षाही जुनं आहे. पूर्ण मातीचं घर आहे. त्याला बाहेरून फक्त प्लास्टर केलेलं आहे. त्यामुळे घरात असलेल्या सगळ्या वस्तू या खूप जुन्या आहेत. सजावट पूर्ण झाल्यावर आम्ही गेलो बाप्पाला घरी आणण्यासाठी…आणि हो जावयाने मुलाची कमी भरून काढली हा…पण, खरं सांगू? मुलगी आणि मुलगा असा काहीच फरक नसतो. आपण सेवा कोणाकडून करून घ्यायची हे सुद्धा त्याच्या हातात असतं. त्याची इच्छा…तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया…” अशी पोस्ट अंकिताने शेअर केली आहे.

दरम्यान, अंकिताच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत कुणालचं विशेष कौतुक केलं आहे.