झी मराठी वहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या शोची व या शोमधील कलाकारांविषयी चर्चा नेहमीच होत असतात. या शोमधून कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडेसारख्या अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. यात काही काळाने नव्याने सहभागी झालेला सदस्य म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय व मेहनतीच्या जोरावर अंकुरने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अंकुर वाढवेने प्रायोगिक रंगभूमीच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पुढे एकांकिका, तसंच मालिका व कार्यक्रमामधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अंकुर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.
अशातच अंकुरने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अंकुरने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाबद्दलची पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अवयवदान आणि देहदानाचा निर्णय घेतला आहे. अंकुरने मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलबाहेरील पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत सोशल मीडियाद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये अंकुरने असं म्हटलं, “निमित्त बायकोच्या वाढदिवसाचं! आम्ही दोघांनीही आज जेजे हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर “अवयवदान आणि देहदान” संकल्प केला आहे. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” यापुढे त्याने या इच्छेला पूर्णरूप देण्यासाठी डॉ. रेवत कानिंदेचे आभारही मानले आहेत. अंकुरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेकजण त्याच्या या कृतीचं कौतुक करत आहेत. “खुप छान”, अतिशय स्तुत्य उपक्रम” अशा कमेंट्सद्वारे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, २८ जून २०१९ रोजी अंकुरचा विवाह पार पडला होता. लग्नाचे काही खास फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची माहिती दिली होती. त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या रंगभूमीवर ‘अंजू उडाली भुर्रर्रर्र’ या बालनाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.