Marathi Actress Reacts To Bigg Boss Rumours : बहुचर्चित ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस या सीझनची सुरुवात होणार आहे. असं असताना त्यासाठी अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा केली जात आहे. त्यातच एक नाव मराठमोळ्या अभिनेत्रीचंही घेतलं जात आहे. प्रत्येक सीझनच्या वेळी या मराठी अभिनेत्रीचं नाव चर्चेत असतं.

सलमान खान सूत्रसंचालन करीत असलेला ‘बिग बॉस’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यकमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अशातच आता ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन येत्या २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अनुषा दांडेकरच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. अनुषाने आजवर हिंदीतील अनेक कलाकृतींमध्ये काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिनं हिंदीसह मराठीतही काम केलं आहे.

“‘बिग बॉस’च्या घरता कधीच जाणार नाही”, असं का म्हणाली अनुषा दांडेकर?

अनुषा दांडेकरनं आता ‘बिग बॉस’बद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची घोषणा झाली किंवा चर्चा सुरू झाली की, अनुषाचं नाव नेहमी घेतलं जातं, असं तिनं म्हटलं आहे. ‘न्यूज १८’शी संवाद साधताना आता अभिनेत्रीनं याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, “खरं तर मला याबद्दल काहीच कल्पना नाहीये की, प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा का होते? मी हे स्पष्ट केलं आहे की, मी त्या घरात कधीच जाणार नाही.”

अनुषा पुढे गमतीनं म्हणाली, “त्यांनी मला मी त्या घरात न जाता, फुकट प्रोमो देत असल्यानं त्याचे पैसे द्यायला हवेत.” त्यानंतर तिला निर्मात्यांनी कधी तुझ्याशी संपर्क साधला का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “कधीच नाही. एक फोनसुद्धा केला नाही. मला वाटतं त्यांना माहीत असावं की, मी अर्ध्यातच बाहेर पडेन. पण खरंच जर ते असं माझं नाव वापरणार असतील, तर त्यांनी मला त्याचे पैसे द्यायला हवेत.”

‘बिग बॉस’बद्दल अनुषा पुढे म्हणाली, “हा वैयक्तिक निर्णय आहे. मला वाटतं की, जे लोक त्या कार्यक्रमात जातात, ते खूप हुशार असतात. पण मी? मला यामध्ये रस नाही. हे माझं काम नाहीये.” अभिनेत्रीला इतर रिअॅलिटी शोबद्दलही विचारण्यात आलं होतं. तिला ‘खतरों के खिलाडी’बद्दल विचारलं गेलं असताना ती म्हणाली, “मला यासाठी विचारणा झाली होती; पण पुन्हा तेच हे ते नाहीये, जे मला करायचं आहे. जे मला आवडतं ते मी करतच आहे आणि मला तेच करत राहायचं आहे.” त्यामध्ये तिनं ती लवकरच एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याबद्दल सांगितलं आहे.