काही मालिका वेगळ्या कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करीत असतात. काही मालिका या सतत चर्चेत असतात. अशाच काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आहे. झी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
झी मराठी वाहिनीने इन्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून, सध्या या प्रोमोची चर्चा होताना दिसत आहे.
अर्जुनचा ‘तो’ निर्णय ऐकून अमोल पडला बेशुद्ध
व्हिडीओच्या सुरुवातीला अर्जुन अप्पीला म्हणतो, “आपण ज्या ज्या वेळी एकत्र असू, ते फक्त अमोलसाठी असू. इथून पुढे आपल्यात नवरा-बायकोचे नाते नसेल अप्पे. हे जे आपल्यात ठरलंय ना ते चुकूनपण अमोलला नाही कळलं पाहिजे.” मात्र, अमोल त्याचे हे सर्व बोलणे ऐकतो आणि तो दाराबाहेर बेशुद्ध पडतो. अप्पी खोलीच्या बाहेर येत असताना तिला अमोल जमिनीवर पडलेला दिसतो. ती मोठ्याने अमोल म्हणून ओरडते. त्यानंतर अमोलला दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे दिसत आहे. अप्पी रडत असून, अर्जुनच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती फाईलमधील कागद इकडे-तिकडे करीत म्हणते, “अमोल तुझे रिपोर्ट जरी बदलत असलो ना तरी तुझी लाइफलाइन दोनच महिन्यांची आहे.” त्यानंतर तो माणूस विचित्र पद्धतीने हसताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, ‘अर्जुनचा निर्णय अमोलच्या जीवावर बेतेल का..?’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर यावर कमेंट करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “एकदम फालतू आणि बोगस मालिका झालीये ही, कायपण फालतूगिरी दाखवत आहेत यात. बंद करा आता ही मालिका.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “संपवा मालिका.” तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “काहीच चांगलं दाखवत नाहीत.”
आता मालिकेत पुढे काय होणार, अमोल कधी बरा होणार, अप्पी आणि अर्जुनचे नाते सुधारणार का, मालिकेत नवे वळण येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमोल बरा झाल्यानंतर अर्जूनच्या निर्णयाचा त्याच्यावर काय परिणाम होणार, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.