Sairaj Kendre Dance Video : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर.’ अभिनेत्री श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शन निर्मिती असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतचं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टनं प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अडीच वर्ष अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं होतं. यात सोशल मीडियावरून प्रसिद्धी झोतात आलेला साईराज केंद्रे झळकला.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत साईराज केंद्रेनं ( Sairaj Kendre ) सिम्बा म्हणजे अमोलची भूमिका साकारली होती. अप्पी आणि अर्जुनचा तो मुलगा दाखवला होता. साईराजची ही भूमिका प्रेक्षकांचा चांगलीच पसंतीस पडली होती. आजही साईराजला सिम्बा म्हणून अधिक ओळखलं जातं. सध्या साईराजच्या जबरदस्त डान्स व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे
साईराज केंद्रेच्या( Sairaj Kendre ) इन्स्टाग्रामवर नुकताच त्याचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये साईराज रंगीबेरंगी शर्ट, कार्गो आणि डोक्यावर टोपी अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं सध्या ट्रेंडमध्ये असलेलं ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर धमाल डान्स केला आहे. त्याच्या डान्ससह हावाभावाचे अनेकांनी कौतुक केलं आहे. अवघ्या तासांभरात साईराजच्या या डान्स व्हिडीओला ३३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
साईराज केंद्रेच्या ( Sairaj Kendre ) या डान्स व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “खूप छान”, “गोड”, “सुपर हिरो”, “खूप भारी”, “छोटा भाई”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तसंच अनेकांनी हार्टचं इमोजी शेअर केलं आहे.
दरम्यान, साईराजबद्दल बोलायचं झालं तर, २०२३मध्ये गणेशोत्सवात ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं खूप चर्चेत आलं होतं. या गाण्यानं अक्षरशः सगळ्यांना वेडं लावलं होतं. हे गाणं अधिक लोकप्रिय झालं ते म्हणजे साईराजमुळे. साईराजनं या गाण्यावर केलेला डान्स व हावभावानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावरील त्याचा व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर साईराज अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला आणि मग तो ‘झी मराठी’च्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत झळकला.