बिग बॉस मराठीचं चौथं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. स्पर्धकांमध्ये सध्या वाद, भांडणं सुरु आहेत. खेळ पुढे जात असताना स्पर्धकांमधील नात्यांची गणितंही बदलताना दिसत आहेत. अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात चांगली मैत्री असल्याचं सुरुवातीपासूनच पाहायला मिळत आहे. पण नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या अपूर्वा नेमळेकर “जवळच्या माणसांना किंमत नसते” असं म्हणताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.
अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तिचं करिअर आणि खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. अपूर्वाने तिचं पहिलं लग्न, घटस्फोट आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल बिग बॉसच्या घरात बरेच खुलासे केले आहेत. त्यानंतर आता तिने बिग बॉसच्या घरात “जवळच्या माणसांना आपली किंमत नसते” अशी खंत व्यक्त केली आहे. तिचा हा व्हिडीओ कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डवरून शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा-“मला अपूर्वा नेमळेकरचं तोंडही बघायचं नाही” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेली यशश्री स्पष्टच बोलली
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बेडरुममध्ये अपूर्वा, अक्षय, अमृता देशमुख एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी अपूर्वा भावुक झालेली पाहायला मिळते. ती डोळ्यात पाणी आणून म्हणते, “कोणाचा फोटो फाडल्यामुळे कोणाला वाईट वाटलं याची त्याला चिंता आहे पण अपूर्वालाही कधीतरी वाईट वाटू शकतं हे कोणाला समजत नाही. खरंच जवळच्या माणसांनाच आपली कधीच किंमत नसते.” यावर अक्षय तिला म्हणतो, “ठीक आहे त्यानिमित्ताने तू मला आपलं जवळचं मानते आहेस.”
अक्षयच्या बोलण्यावर अपूर्वा आणखी दुःखी होते आणि म्हणते, “मी तुला नेहमीच जवळचं मानते, तू माझ्याशी बोलला नाहीस तर कदाचित तुला फरक पडणार नाही पण मला फरक पडतो पण मी तुझ्यावर मालकी हक्क सांगायला येणार नाही.” त्यावर अक्षय तिला तुझं रडणं मला आवडलेलं नाही असं सांगतो. त्यावर ती “मला मनापासून वाईट वाटलं म्हणून रडले” असं म्हणते. अपूर्वाच्या बोलण्यावर अक्षय, “मला माहीत आहे तू मनापासून रडलीस, तू काही ग्लिसरीन घेऊन रडणार नाही माहीत आहे.” असं म्हणून वातावरण हलकं करायचा प्रयत्न करतो. त्यावर अपूर्वाने त्याला, “तू असा असंवेदनशील कसा असू शकतोस” असं म्हणत त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर सर्व हसू लागतात.