Armaan Malik Never Wanted Brother Amaal Malik To Join Bigg Boss : ‘बिग बॉस १९’च्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. २४ ऑगस्ट रोजी ‘बिग बॉस’च्या घरात १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यात कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशा अनेकांचा समावेश आहे. लोकप्रिय म्युझिक कंपोजर अमाल मलिकनेही त्यात सहभाग घेतला आहे. अशातच आता त्याचा भाऊ लोकप्रिय गीतकार व गायक अरमान मलिक याने त्याच्यासाठी पोस्ट केली आहे.

अमाल मलिक सध्या ‘बिग बॉस’च्या घरात असून, तो त्या घरात गेल्यानंतर त्याच्या टीमने त्याचे तेथील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावेळी त्याचा भाऊ अरमान मलिकने त्याच्या पोस्टला रिप्लाय दिला आहे. अरमान रिप्लाय देत म्हणाला, “जिंकून ये शेर खान”. पुढे यादरम्यान अरमानला एका नेटकऱ्याने अमाल मलिकच्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याबद्दल विचारलं होतं. त्यावर त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.

अरमान मलिकची ‘बिग बॉस’बद्दल प्रतिक्रिया

भावाच्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याबद्दल अरमान म्हणाला, “खरं तर मला हे आवडलेलं नाहीये, मी त्याला बिग बॉसमध्ये जाऊ नकोस असंच सांगितलेलं; पण आता त्याला कोण समजावणार. तरीसुद्धा तू आता तिथे गेलाच आहेस, तर बोर्डिंग शाळेत गेलास, असं समजून थोडी मस्ती करून परत ये. त्यानंतर त्याला तू ‘बिग बॉस’ बघतोस का, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, ‘हो, अमाल काय मस्ती करतोय ते पाहण्यासाठी बघतोय.’

‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर अमाल मलिक सलमान खानसह त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलताना दिसला. तो म्हणाला, “मी जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट केलेली तेव्हा माझ्या आई-वडिलांनाही ते आवडलं नव्हतं आणि अनेकांनी त्याबद्दल मला विचारलेलं”. जेव्हा सलमाननं त्याच्या पोस्टबद्दल विचारलं तेव्हा अमाल म्हणाला, “मी नैराश्यात होतो”.

दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात प्रणीत मोरे, गौरव खन्ना, अशनूर कौर, आवेज दरबाज, कुनिका सदानंद, अमाल मलिक यांसारखे एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. आता पुढे या खेळात काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अर्थातच या पर्वाचा विजेता कोण ठरेल याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.