Ashok Ma.Ma. – ‘अशोक मा.मा.’ मालिकेत सध्या घरात अनेक बदल झपाट्याने होत आहेत. अनिश आणि भैरवी या दोघांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होतं चाललं आहे. दोघांमधील भावना आता लपून राहिलेल्या नाहीत. अशोक मामा या सगळ्या गोष्टींचं शांतपणे निरीक्षण करत आहेत. भैरवी आणि अनिशचं नातं आता एका नव्या वळणावर येताना दिसत आहे.
याच दरम्यान, अक्षय तृतीया या सणाच्या निमित्ताने मामांनी घेतलेला एक मोठा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी आपल्या घराची जबाबदारी भैरवीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे भैरवीची जबाबदारी वाढली आहे. पण राधा मामी मात्र वेगळीच स्वप्न रंगवत आहे. आता राधा मामीने पाहिलेली स्वप्न पूर्ण होणार की, भैरवीच्या साथीने मामा या सगळ्या गोष्टी उधळून लावणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
मात्र, दुसरीकडे घरात एक गुप्त डावपेचही शिजतोय. राधा मामी आणि किश्या मामा हे दोघंही घरात राहण्यासाठी माफी मागतात. पण, खरंतर हा त्यांचा डाव असतो. राधा घरातील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तिचं स्वप्न या घराची ‘राणी’ होण्याचं आहे आणि तिची ही इच्छा आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे.
भैरवीवरची जबाबदारी, अनिशबरोबरचं फुलणारं नातं, मामांचा निर्णय आणि राधा मामीच्या गुंतागुंतीच्या योजना या सगळ्यामुळे घरात नात्यांची समीकरणं सतत बदलत आहेत.
आता ‘अशोक मा.मा.’ मालिकेत पुढे काय होणार? कोणाच्या हातात घराची सूत्र राहणार? आणि राधाचं ‘स्वप्न’ साकार होणार की भंगणार? या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना पुढच्या भागात मिळणार आहेत.
दरम्यान, ‘अशोक मा.मा.’ ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते.