Ashok Saraf played the Tambourine: मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. चित्रपट, मालिकांमधील त्यांच्या भूमिकांना चांगलीच पसंती मिळताना दिसते.
सध्या अशोक सराफ कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत अशोक सराफ यांनी कडक शिस्तीचे, तितकेच प्रेमळ, चुकणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावणारे, चांगले वागणाऱ्यांशी तितक्याच प्रेमाने वागणारे, नातवंडांसाठी सतत काही ना काही करणारे अशी भूमिका साकारली आहे.
अशोक सराफ यांनी वाजवली डफली
आता मात्र अशोक सराफ त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अशोक सराफ यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ते डफली वाजवताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा आहे. व्हिडीओ शेअर करताना अशोक मा. मा. असे लिहिले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. “ग्रेट. आमचं लहानपण आनंदी घालवण्यासाठी धन्यवाद”, “पूर्वीसारखा तुमचा एखादा सिनेमा येऊ द्या. आम्ही वाट पाहतोय”, “एक नंबर”, “मामा”, “सुपर मामा”, “मस्त! सर”, “वाह”, “हरहुन्नरी कलाकार”, “कॉमेडीचा बादशाह”, “अति उत्तम”, “सन्माननीय अशोक सर”, “आज लक्ष्मीकांत बेर्डे पाहिजे होते. तुम्हा दोघांचे चित्रपट बघून मन भरून येते”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. अशोक मा.मा. या मालिकेत सतत नवीन काहीतरी घडताना दिसते. मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.
अशोक सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ‘अशी ही बनवानबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘माझा पती करोडपती’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘वेड’, ‘बिनकामाचा नवरा’ अशा अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसवले. मराठीसह त्यांनी काही हिंदी चित्रपटांतदेखील काम केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.