Asit Modi on Dilip Joshi Munmun Dutta quit Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: काही टीव्ही मालिका या वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात. अशा कार्यक्रमांतील कलाकार प्रेक्षकांचे विशेष लाडके असतात. कलाकारांना वर्षानुवर्षे त्याच पात्रांमध्ये पाहिल्यानंतर अमुक एखादे पात्र म्हणजे अमुक एक कलाकार असे प्रेक्षकांच्या मनात समीकरण पक्के असते.
अशाच लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
मालिकेतील जेठालाल, तारक मेहता, बबिता, बापूजी, भीडे मास्तर, माधवी भाभी, अय्यर, टपू सेना ही आणि मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. या पात्रांच्या वेगळेपणामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी मालिका सोडली. आता दिलीप जोशी व मुनमुन दत्ता यांनीदेखील ही मालिका सोडल्याचे म्हटले जात होते.
गोकुळधाम सोसायटीमधील सर्व सदस्य बाहेर फिरण्यासाठी गेल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. ज्यामध्ये भूतनीचे कथानक पाहायला मिळाले. यामध्ये जेठालाल व बबीता ही पात्रे दिसली नाहीत. त्यामुळे या दोघांनी मालिका सोडल्याच्या चर्चा झाल्या. जेठालाल हे पात्र अभिनेते दिलीप जोशी तर बबीता हे पात्र मुनमुन दत्ता यांनी साकारले आहे. आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या चर्चांवर मौन सोडले आहे.
“सकारात्मक मानसिकता ठेवण्याचा प्रयत्न…”
असित मोदी यांनी नुकतीच ‘मनी कंट्रोल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत असित मोदी म्हणाले, “सद्यस्थितीत सोशल मीडिया खूप नकारात्मक झाला आहे. मात्र, तुम्ही सकारात्मक मानसिकता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा एक सकारात्मक कार्यक्रम आहे. हा आनंद पसरवणारा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. त्यामुळे, लोकांनी त्याबद्दल सकारात्मक विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवरून अफवा पसरवणे योग्य नाही.”
दिलीप जोशी व मुनमुन दत्ता यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, “ते आमच्या टीमचा भाग आहेत. त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते त्या एपिसोडमध्ये नव्हते.”
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा कार्यक्रम २००८ सालापासून सब टीव्ही प्रदर्शित होत आहे.