Asit Modi Talk’s About Bharti Singh’s Entry In TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीच्या एक्झिटनंतर अनेकदा मालिकेतील तिच्या पुनरागमनाबद्दल बोललं गेलं. अशातच आता निर्माते असित मोदी यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामध्ये अभिनेत्री भारती सिंहच्या एन्ट्रीबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
असित मोदी हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते आहेत. अनेकदा ते या मालिकेमुळे चर्चेत असतात. दिशा वकानी यांच्या पुनरागमनाबद्दल त्यांना अनेकदा विचारलं जातं. अशातच पुन्हा एकदा त्यांना याबाबत विचारल असताना, त्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
असित मोदी व अभिनेत्री भारती सिंह मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान भेटले होते. यादरम्यानचा दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यामध्ये त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये भारती सिंहच्या एन्ट्रीबद्दल सांगितल्याचं पाहायला मिळतं. ते म्हणाले, “जर जेठालाल पंजाबी असता, तर दयाच्या भूमिकेत भारती सिंह असती”.
भारती सिंहने आजवर तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतही दया हे विनोदी पात्र आहे. दिशा वकानीने ते पात्र उत्तमरीत्या साकारलं होतं. त्यामुळे अजूनही प्रेक्षक मालिकेत तिचं पुनरागमन व्हावं याची वाट पाहत असतात.
दिशा वकानीने २०१८ साली मालिकेतून ब्रेक घेतला होता. अभिनेत्री तेव्हा गरोदर असल्यानं तिनं मॅटर्निटी लिव्ह घेतली होती. परंतु, त्यानंतर दिशा काही मालिकेत परतली नाही. सात वर्षांपासून प्रेक्षक तिला दयाच्या भूमिकेत पुन्हा पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत आहेत.
दरम्यान, असित मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. ते म्हणालेले, “दिशा वकानींचं मालिकेत पुनरागमन होणं कठीण आहे. लग्नानंतर महिलांच्या आयुष्यामध्ये बदल होतात. लहान मुलांबरोबर व्यावसायिक व खासगी आयुष्य सांभाळणं आव्हानात्मक असतं”. पुढे ते म्हणाले, “देवानं काहीतरी चमत्कार करावा आणि त्यांचं मालिकेत पुनरागमन व्हावं. त्या आल्या, तर ही खूप चांगली गोष्ट असेल; पण जर नाही आल्या, तर आम्हाला दयाच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करावी लागेल”.