Avinash Narkar shares emotional post : अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच वेगवेगळ्या रील्स, फोटो ते त्यांच्या अकाउंटवरून शेअर करत असतात. अशातच आता अविनाश नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांचे मित्र व अभिनेते अमोल बावडेकर यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमोल बावडेकर ‘सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. परंतु, रविवारी १५ जूनला नाटकाच्या प्रयोगापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
अविनाश नारकर यांनी अमोल यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर करीत देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. अविनाश व अमोल हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अविनाश यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना अमोल यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर करीत “देवा माझ्या या डार्लिंगला कोणाची नजर लागू देऊ नकोस”, असं लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये अमोल व अविनाश नारकर एकमेकांसह गप्पा मारताना दिसत आहेत.
‘सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते अमोल बावडेकर यांना रविवारी १५ जून रोजी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रयोगाला काही तास उरले असतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अमोल यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. या संदर्भातील माहिती नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती.

‘सुंदर मी होणार’ या नाटकासह अमोल बावडेकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ या मालिकेतही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. अमोल यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासह ते उत्तम गायनसुद्धा करतात.
दरम्यान, अविनाश यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ते ‘पुरुष’ या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यासह ते ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून पाहायला मिळत आहेत.