‘बालिका वधू’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘सपने सुहाने लडकपन के’, ‘अदालत’ या मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री निधी झा दुसऱ्यांदा आई झाली आहे. ३७ वर्षांच्या निधीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तिच्या पतीने मुलीबरोबरचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली.
निधी झा हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर भोजपुरी चित्रपटही चित्रपट केले आहेत. निधी झा हिने भोजपुरी अभिनेता यश कुमारशी २०२२ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अडीच वर्षात निधीने दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. यश व निधी यांना शिवाय नावाचा मोठा मुलगा आहे.
यश कुमारने लेक व पत्नी यांच्याबरोबरचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने नवजात लेकीचा चेहराही दाखवला. “लक्ष्मीचं आगमन झालं आहे. तुम्ही सर्व भोजपुरी लोक, माझे कुटुंब आहात. आज सकाळी, आमच्या कुटुंबात लाडकी लेक आली आहे. आमच्या लक्ष्मीला खूप सारे आशीर्वाद द्या. धन्यवाद.
तुमचेच – यश कुमार आणि निधी,” असं कॅप्शन यश कुमारने या फोटोला दिलं आहे. यशने ही पोस्ट शेअर केल्यावर चाहते या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत.
पाहा पोस्ट
निधी झा हिने २०२२ मध्ये भोजपुरी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता यश कुमार याच्याशी लग्न केलं. निधी व यश ही जोडी भोजपुरी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध जोडी आहे. त्यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडिया व्हर्सेस पाकिस्तान’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची जवळीक वाढू लागली, त्याच वर्षी यशने त्याची पहिली पत्नी अंजना सिंग हिला घटस्फोट दिला.
निधी व यश यांची सेटवर सुरू झालेली मैत्री प्रेमात बदलली. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही काळातच, त्यांना त्यांचा पहिला मुलगा शिवायचे स्वागत केले. आता, निधी व यश दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे.
