अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मागील ५० वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहेत. इतक्या वर्षांत त्यांनी अनेक पिढ्यांमधील कलाकार व स्टाफबरोबर काम केलंय. अलिकडेच ‘भाभीजी घर पर हैं’ चित्रपटातील अभिनेता सानंद वर्माने (Sanand Verma) बिग बींबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. पहिल्यांदा भेटले तेव्हा अमिताभ बच्चन यांनी आपल्याला मुलासारखे वागवले, पण जेव्हा ते दुसऱ्यांदा भेटले तेव्हा त्यांचं वागणं अजिबात आवडलं नाही, असं सानंदने सांगितलं.

हिंदी रशशी बोलताना सानंद म्हणाला की जेव्हा तो पहिल्यांदा अमिताभ बच्चनला भेटला तेव्हा ते खूप प्रेमाने वागले होते. “मी अनेक स्टार्सबरोबर बोललो आहे, पण मी त्यांच्याबद्दल कधीच फारसा विचार केला नाही. पण जेव्हा मी कौन बनेगा करोडपतीच्या प्रोमोचे शूटिंग करत होतो तेव्हा मी अमिताभ बच्चन यांना जाणून घेतलं. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते असे वागत होते, जणू मला वाटलं की मी अभिषेक बच्चन आहे. मला वाटलं की मी त्यांचा मुलगा आहे. आम्ही तीन तास बोललो होतो,” असा अनुभव सानंदने सांगितला.

दुसऱ्या भेटीबद्दल काय म्हणाला सानंद?

सानंदच्या मते, जेव्हा तो दुसऱ्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटला तेव्हा त्यांचं वागणं वेगळं होतं, जे त्याला खटकलं. सानंद म्हणाला, “दुसऱ्यांदा जेव्हा मी त्यांना एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी भेटलो तेव्हा ते चांगले वागले नाहीत. शूटिंग पूर्ण केल्यानंतर, मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला तुमच्याबरोबर दोनदा काम करण्याची संधी मिळाली.’ पण त्यांनी माझ्याकडे पाहिलंही नाही, ते एका पेंटिंगकडे पाहत राहिले आणि म्हणाले, ‘देव तुम्हाला तिसऱ्यांदा संधी मिळो.'”

sanand verma amitabh bachchan
सानंद वर्मा व अमिताभ बच्चन (फोटो- इन्स्टाग्राम)

बिग बींचे चित्रपटसृष्टीत मित्र नाहीत – सानंद

दुसऱ्या भेटीत अमिताभ बच्चन यांचं वागणं आवडलं नसलं तरी, त्यांचा खूप आदर करत असल्याचं सानंद म्हणाला. “पहिल्यांदा त्यांनी खूप महत्त्व दिलं आणि दुसऱ्यांदा त्याने मला पूर्णपणे दुर्लक्ष केलं, हा फरक स्पष्ट होता. मी अमितजींवर खूप प्रेम करतो आणि त्यांचा खूप आदर करतो. मला वाटत नाही की हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा दुसरा कोणी अभिनेता आहे, पण हो, चित्रपटसृष्टीत त्याचा कोणीही मित्रही नाही,” असं सानंदने म्हटलं.