झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत भुताची भूमिका करून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळे जोशी होय. सरितासाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं. कारण नववर्षाच्या दिवशीच (१ जानेवारी २०२४ रोजी) तिने गोंडस बाळाला जन्म दिला. सरिताच्या घरी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता तिने बाळाचं नाव जाहीर केलं आहे.
सरिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून बाळाच्या नावाबाबत माहिती दिली आहे. सरिताने एक क्युट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा, तिच्या पतीचा व बाळाचा हात दिसतोय. बाळाच्या हातात ब्रेसलेट असून त्यावर अन्वित असं नाव लिहिलंय. “आमच्या आयुष्यातील नवीन प्रेम, आमचा छोटा चमत्कार…अन्वित”, असं कॅप्शन सरिताने दिलंय. तसेच तिने अन्वितचा अर्थही सांगितला आहे. अन्वित म्हणजे शौर्य आणि लीडरशिप असं तिने लिहिलंय.
सरिताने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आहेत. बाळाचं नाव खूप छान ठेवलंय, असं अनेकांनी म्हटलं आहे. बाळाच्या जन्मानंतर सरिता व तिचे पती सौरभ जोशी खूप आनंदी आहेत. लग्नानंतर पाच वर्षांनी ते पालक झाले आहेत.
दरम्यान, सरिताला १ जानेवारी २०२४ रोजी मुलगा झाला. तिने ‘इट्स अ बॉय’ लिहिलेला एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच कॅप्शनमध्ये बाळाच्या जन्माची तारीखही सांगितली होती.