Bhagya Dile Tu Mala Fame Tanvi Mundle Praises Vivek Sangle : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेता विवेक सांगळेने नुकतच स्वत:चं घर खरेदी केलं आहे. नवीन घराच्या निमित्तानं विवेकच्या कलाकार मित्र-मैत्रिणींनी त्याच्या घराला भेट दिली. यावेळी तन्वी मुंडलेही उपस्थित होती आणि तिनं विवेकचं भरभरून कौतुकही केलं आहे.
विवेक सांगळे अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. आजवर त्यानं अनेक मालिकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकी वर्षं काम केल्यानंतर आता अभिनेत्यानं मुंबईत स्वत:च आलिशान घर खरेदी केलं आहे. त्यानिमित्तानं त्याचे सहकलाकार, तसेच इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी त्याच्या घराला भेट देत त्याचं कौतुक केलं आहे.
तन्वी मुंडलेने केलं विवेक सांगळेचं कौतुक
यावेळी ‘भाग्य दिले तू मला’ फेम तन्वी मुंडलेनं विवेकचं कौतुक केलंय. विवेक, तन्वी यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तन्वीला विवेकच्या नवीन घराबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर तन्वी म्हणाली, “आपल्या सहकलाकाराचं, जवळच्या मित्राचं आज स्वत:चं घर झालं यापेक्षा अभिमानस्पद गोष्ट दुसरी काय असणार आहे. हे त्याचं दुसरं की तिसरं घर असेल; पण मुंबईत घर घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. लालबागसारख्या ठिकाणी त्यानं स्वत:च्या बळावर कोणाचीही मदत न घेता वा घरच्यांकडून पैसे न घेता घर खरेदी केलं आहे. त्यामुळे मला त्याचं कौतुक आहे.”
तन्वी पुढे म्हणाली, “‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सेटवर विवेक अनेकदा या घराच्या कामानिमित्त फोनवर बोलायचा. त्याचे आणि माझे सतत एकत्र सीन असायचे. तेव्हा अनेकदा तो घराच्या कागदोपत्री कामांमध्ये व्यग्र असायचा तेव्हा मला वाटायचं की, किती कटकटीचं काम आहे. त्याला यामध्ये एवढं गुंतलेलं पाहून मला असं झालेलं की, असं सगळं असेल, तर मी कधीच स्वत:चं घर खरेदी करणार नाही. पैसे असतील तरी भाड्याच्या घरात राहीन. कारण- ही कटकट वगैरे एवढं मला झेपणार नाही, असं वाटायचं. पण, आज जेव्हा मी बघतीये ना तेव्हा कळतंय की, हे त्याच्या मेहनतीचं फळ आहे.”

विवेकचं कौतुक करत तन्वी पुढे म्हणाली, “त्याला सलाम आहे. आपण जिथे राहिलो, तिथेच घर घेणं आणि मुंबईत घर घेणं सोपी गोष्ट नाही. त्याला आता मलाबार हिल्समध्येही घर घ्यायचं आहे. तो आताच म्हणतोय की, तो पुढच्या दोन-तीन वर्षांत तिथेही घर घेईल. मला आता असं वाटतंय की, तो खरंच तिथेही घर घेईल.” तन्वी पुढे व्यक्त होत म्हणाली, “खरं तर हे शब्दांत नाही सांगता येणार. कारण- ही खूप भावनिक गोष्ट आहे.”