Bharti Singh Announces Second Pregnancy : कॉमेडियन भारती सिंगने आनंदाची बातमी दिली आहे. भारती दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली.

टीव्ही रिअॅलिटी शो होस्ट व कॉमेडियन भारती सिंग ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा मातृत्व अनुभवणार आहे. लग्नानंतर आठ वर्षांनी भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. भारती व हर्ष यांना एक मुलगा आहे. लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होईल.

भारतीने इन्स्टाग्रामवर पती हर्ष लिंबाचियाबरोबरचा एक फोटो पोस्ट केलाय. त्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय. “आम्ही पुन्हा गरोदर आहोत,” असं कॅप्शन भारतीने या फोटोला दिलं आहे.

भारती सिंगची पोस्ट

भारती सिंगच्या या फोटोवर चाहते व सेलिब्रिटी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. परिणीती चोप्रा, कृष्णा श्रॉफ, निती टेलर, पार्थ समथान, द्रष्टी धामी, अदिती भाटिया, दिव्या अग्रवाल, दीपिका सिंह, जॅमी लिव्हर, दीपशिखा नागपाल यांनी कमेंट्स करून भारती व हर्ष यांचं अभिनंदन केलं आहे.

भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. लक्ष्यचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. लक्ष्य साडेतीन वर्षांचा झाला आहे. आता भारती पुन्हा गरोदर आहे.

भारती सिंग व हर्ष यांनी अनेकदा त्यांना मुलगी हवी, अशी भावना व्यक्त केली आहे. आपल्या व्लॉगमध्ये ते बरेचदा दुसरी मुलगी हवी असं म्हणताना दिसतात. आता भारतीने आनंदाची बातमी शेअर केल्यावर चिमुकल्या लक्ष्यला धाकटी बहीण यावी आणि हर्ष व भारतीची मुलीची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.