Bigg Boss 18 Fame Actress : गेल्या काही दिवसांमध्ये कलाकार आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार मंडळींच्या घरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरीही चोरीची घटना घडली आहे, ही अभिनेत्री म्हणजे काशिश कपूर.
‘बिग बॉस १८’ मध्ये झळकलेली अभिनेत्री कशिश कपूर हिच्या घरी चोरी झाली आहे. याबद्दल तिने घरातील मदतनीस सचिन कुमार चौधरी याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. कशिश कपूरने आरोप केला आहे की, मदतनीस सचिनने तिच्या कपाटातून सुमारे ४ लाख रुपये चोरले आहेत. या तक्रारीवरून ९ जुलै रोजी अंबोली पोलिसांनी सचिनविरुद्ध चोरीचा (कलम ३८० अंतर्गत) गुन्हा दाखल केला आहे.
कशिशच्या घरातील मदतनीस सचिन कुमार मागील पाच महिन्यांपासून कशिशच्या घरी घरकाम करत होता. तो दररोज सकाळी ११:३० वाजता येत असे, घरकाम करून दुपारी एक वाजता निघून जात असे. कशिशच्या म्हणण्यानुसार, ६ जुलै रोजी तिच्या कपाटात सात लाख रुपये होते. पण ९ जुलै रोजी जेव्हा ती तिच्या आईला पैसे पाठवण्यासाठी कपाट उघडलं, तेव्हा फक्त अडीच लाख रुपयेच शिल्लक राहिलेले दिसले.
काशिश कपूर इन्स्टाग्राम पोस्ट
यातील एकूण साडेचार लाख रुपये कपाटात नसल्याचे तिला दिसले आणि यानंतर तिने पूर्ण कपाट तपासले. पण तिला बाकीचे पैसे सापडले नाहीत. याबद्दल कशिशने सचिनकडे विचारणा केली, तेव्हा तो खूप घाबरलेला दिसला. यावेळी कशिशने त्याच्या खिशाची झडती घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याने नकार दिला. त्यानंतर त्याने पन्नास हजार रुपये दिले आणि तिथून पळून गेला. यामुळे कशिशला संशय आला की, उरलेले पैसेही त्यानेच चोरले असावेत.
मग याबद्दल तिने अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून सचिनचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना कशिश म्हणाली, “मला या घटनेमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. मी त्याच्यावर खूप विश्वास केला होता. परंतु त्याने माझा विश्वासघात केला. मला आशा आहे की पोलीस त्याला लवकरात लवकर पकडतील आणि मला न्याय मिळेल.”
दरम्यान, कशिश कपूर मूळची बिहारमधील पुर्णिया जिल्ह्याची आहे. सध्या ती मुंबईच्या अंधेरी पश्चिम इथे राहते. ती एक चित्रपट अभिनेत्री आहे आणि काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. ती ‘बिग बॉस’मध्येही सहभागी झाली होती. बिग बॉसमुळे ती चांगलीच प्रसिद्धी झोतात आली.