Bigg Boss 19 Contestants : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस १९’ रविवार (२४ ऑगस्टपासून) सुरू होणार आहे. दरवर्षी या शोमधील स्पर्धक आणि वाइल्ड कार्ड एंट्रीजबद्दल बरीच चर्चा होते, परंतु यावेळी अद्याप स्पर्धकांची नावं जाहीर झालेली नाही. मात्र, निर्माते या सीझनमध्ये विदेशी स्टार्सना बोलावण्याची तयारी करत आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत.
बिग बॉस हिंदीमध्ये आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्स सहभागी झाले आहेत. पण यंदाच्या नावांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर जगातील प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन आणि WWE मधील दिग्गज कुस्तीपटू अंडरटेकर आहेत. तसेच प्रसिद्ध वकील अली काशिफ खानही बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकतात, असं म्हटलं जातंय. पण निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही स्पर्धकाचे नाव जाहीर केलेले नाही.
‘बिग बॉस’ची टीम शोमध्ये दरवर्षी नवनवीन प्रयोग करत असते. प्रत्येक सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री होते आणि त्यामुळे शोचे संपूर्ण समीकरण बदलते, असे चित्र पाहायला मिळते. अशा परिस्थितीत, आता ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, यावेळी शोमध्ये भारतातील तसेच विदेशातील पाहुण्यांना वाइल्ड कार्ड म्हणून आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
काही वृत्तांनुसार, ‘बिग बॉस’चे निर्माते सध्या माइक टायसन आणि त्याच्या टीमशी चर्चा करत आहेत. तो काही दिवसांसाठी सलमान खानच्या शोमध्ये पाहुणा म्हणून येऊ शकतो. तसेच अंडरटेकर नोव्हेंबरमध्ये ‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येऊ शकतो, अशा बातम्या आहेत. जर माइक टायसन व अंडरटेकर यंदा बिग बॉसमध्ये झळकले तर या शोची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढू शकते.
काशिफ खान यांच्या नावाची चर्चा
या दोन विदेशी पाहुण्यांबरोबरच देशातील प्रसिद्ध वकील काशिफ खान यांचे नाव देखील यंदा बिग बॉससाठी चर्चेत आहे. त्यांना ‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणूनही बोलावले जाऊ शकते, असं म्हटलं जातंय. सोशल मीडियावरही याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. सध्या तरी हे तिघेही शोचा भाग असतील की नाही याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, माइक टायसन, अंडरटेकर व काशिफ खान यांच्या एंट्रीचे वृत्त खरे ठरले, तर बिग बॉसच्या घरात चांगलाच ड्रामा पाहायला मिळेल. अर्थातच या ड्रामामुळे प्रेक्षकांचंही चांगलं मनोरंजन होईल. विदेशी स्पर्धक आणि भारतीय सेलिब्रिटींमधील संघर्ष शोमध्ये पाहायला मिळणार की नाही हे लवकरच कळेल.