Kunickaa Sadanand Malti Chahar Lesbian Remark : टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे शोमधील स्पर्धकही चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’ सुरू होऊन आता जवळपास ८० हून अधिक दिवस झाले आहेत. शोचा प्रवास आता अंतिम भागाकडे चालला आहे.

‘बिग बॉस’मधील स्पर्धकांची भांडणं आणि वादविवाद काही नवीन नाहीत. शोमधील कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसतात. या वादात सहस्पर्धक एकमेकांवर टीका-टिप्पणी करतात. कधीकधी खालच्या थराला जाऊनही एकमेकांबद्दल राग व्यक्त करताना दिसतात.

अशातच शुक्रवारच्या भागात ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी सहस्पर्धकाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. कुनिका सदानंद यांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे त्या सोशल मीडियावर टीकेच्या धनी बनल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

शोमध्ये एका टास्कदरम्यान मालती तान्याच्या गालाजवळ प्लेट घेऊन गेली. तान्यानं याबद्दल मालतीबद्दल राग व्यक्त करीत ही गोष्ट कुनिका यांना सांगितली. तेव्हा कुनिका यांनी तान्याकडे मालती ‘लेस्बियन’ असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कुनिका यांच्या मालतीबद्दलच्या वक्तव्यामुळे चाहतेही प्रचंड नाराज झाले आहेत.

कुनिका सदानंद यांनी मालती चहरला लेस्बियन म्हटल्याचा व्हिडीओ

शुक्रवारच्या (१४ नोव्हेंबर) भागात कुनिका तान्या मित्तलशी बोलताना म्हणाल्या, “मला एक गोष्ट सांगायची आहे, मला पूर्ण खात्री आहे की मालती मॅडम आहे ना ती लेस्बियन आहे.” यावर तान्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पुढे कुनिका दबक्या आवाजात म्हणाल्या, “तिची देहबोलीदेखील तशीच दिसते आणि ती ज्या पद्धतीने बोलत राहते, याकडे लक्ष दे.” कुनिका यांची ही कुजबूज ऐकून ‘बिग बॉस’नं तोंडातल्या तोंडात पुटपुटू नये असं स्पष्टपणे म्हटलं.

कुनिका यांच्या मालतीबद्दलच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. ‘कुनिका सदानंद यांनी मालती चहरबद्दल केलेली टिप्पणी अत्यंत गैरजबाबदार आणि अपमानास्पद आहे, ‘एखाद्याच्या वागणुकीवरून तिला ‘लेस्बियन’ म्हणणं हे अपमानास्पद आहे; सलमान खानने या प्रकरणावर भूमिका घेतली पाहिजे’, ‘कुनिका सदानंद यांनी तान्या मित्तलशी बोलताना “ती (मालती) लेस्बियन आहे,” असं विधान केलं. एखाद्याच्या लैंगिकतेबद्दल जाणून घेण्याची एवढी उत्सुकता का?’, टीव्हीवर कुणाच्या लैंगिकतेवर भाष्य करणं अजिबात योग्य नाही’, एखाद्याची ओळख त्यांच्या संमतीशिवाय उघड करणं चुकीचं आहे’, ‘स्त्री-सक्षमीकरणाबद्दल बोलणाऱ्या कुनिका यांनी मालतीला ‘लेस्बियन’ म्हणणं हे अत्यंत विरोधाभासी आणि गैरजबाबदारपणाचं लक्षण आहे.’ या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, कुनिका यांच्या मालतीबद्दलच्या वक्तव्यावर आता ‘वीकेंड का वार’मध्ये काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार, याकडे ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान गैरहजर असणार आहे. शनिवार आणि रविवारी होणारा ‘वीकेंड का वार’ बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे.