Bigg Boss 19 Marathi Contestant : ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाची सुरुवात २४ ऑगस्टपासून झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खानच्या उपस्थितीत या शोचा भव्यदिव्य ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. यावर्षी शोची थीम असणार आहे ‘राजनीती’. याशिवाय घरातील बहुतांश नियम देखील बदलण्यात आले आहेत. या पर्वात एकूण १६ स्पर्धकांनी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे.
‘बिग बॉस’च्या हिंदी पर्वात मराठी चेहरे कोण झळकणार याची उत्सुकता दरवर्षी प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली असते. यंदाच्या सीझनमध्ये एका प्रसिद्ध मराठी कॉमेडियनने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. त्याचं नाव आहे प्रणित मोरे. सोशल मीडियावर चाहते त्याला ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ म्हणून देखील ओळखतात. कॉमेडियन प्रणित मोरेचे स्टँडअप कॉमेडी करतानाचे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट इन्स्टाग्रामसह फेसबूकवर व्हायरल होत असतात.
प्रणितने शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर सर्वप्रथम सलमानला, “माझे वडील तुमचे खूप मोठे चाहते आहेत” असं सांगितलं. इतकंच नव्हे तर प्रणित मराठी असल्याने मंचावर भाईजानने सुद्धा त्याचं मराठीत बोलून अभिवादन केलं. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वी रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केल्याचं नमूद केलं. त्यानंतर हळुहळू तो स्टँडअप कॉमेडीकडे वळला.
प्रणितची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. याशिवाय युट्यूबवर सुद्धा त्याचे लाखो सब्सक्रायबर्स आहेत. प्रणितने आजवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींवर देखील त्याच्या शोद्वारे विनोद केले आहेत. मात्र, मध्यंतरी वीर पहारियाबद्दल वक्तव्य केल्याने त्याला १० ते १२ जणांच्या जमावाकडून मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत प्रणितने संताप व्यक्त केला होता. ही घटना उघडकीस आल्यावर वीरने स्वत: पोस्ट शेअर करत प्रणितची माफी मागितली होती आणि या घटनेशी माझा कोणताच संबंध नाहीये असंही वीरने म्हटलं होतं.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात प्रणितचा खेळात टिकून राहण्यासाठीचा मास्टर प्लॅन काय असेल? तो प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.