Bigg Boss 19 Contestants : टेलिव्हिजनवरील सर्वांचा आवडता शो ‘बिग बॉस’ लवकरच सुरू होणार आहे. जेव्हापासून या शोची घोषणा झाली आहे, तेव्हापासून चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच सोशल मीडियावरसुद्धा या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस १९’ शो अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या हंगामाची थीम ‘राजकारण’ असून, या पर्वात प्रेक्षकांना नवीन स्पर्धक पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच ‘स्क्रीन’ने दिलेल्या माहितीनुसार, १० स्पर्धकांची निवड आधीच निश्चित करण्यात आली आहे.

यावर्षी शोच्या सुरुवातीस १५ स्पर्धक घरात प्रवेश करणार असून, नंतर ३-४ स्पर्धक वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शोमध्ये सहभागी होतील. ‘अनुपमा’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला गौरव खन्ना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पायल गेमिंग, अभिनेत्री हुनर हली गांधी, ‘स्प्लिट्सव्हिला’ आणि ‘रोडीज’ फेम सिवेत तोमरसह ‘स्प्लिट्सव्हिला’मधीलच खंक वधवानी आणि ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अरबाज पटेल या स्पर्धकांची निवड जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आहे.

यासह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील गुरुचरण सिंग, अपूर्वा मुखिजा, धनश्री वर्मा हेही बिग बॉस १९ मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. काही मध्यमांच्या वृत्तांनुसार, ‘बिग बॉस १९’साठी निवड झालेल्या स्पर्धकांच्या यादीत यांचं नाव आहे. तसेच, प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदी कलाकार अली असगरलाही शोसाठी विचारण्यात आलं आहे.

‘बिग बॉस १९’च्या ग्रँड प्रीमियरला अवघे काही दिवस उरलेले असताना, निर्माते अजूनही काही स्पर्धकांची निवड करत आहेत. अजूनही काही नव्या स्पर्धकांबरोबर चर्चा सुरू आहेत. दरम्यान, वरील नावे अद्याप अंतिम नाहीत, मात्र या स्पर्धकांची निवड निश्चित असल्याची शक्यता अधिक आहे.

‘बिग बॉस १९’ येत्या २४ ऑगस्टपासून रात्री १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस १९’ हा शो प्रेक्षकांना ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर पाहायला मिळेल. त्यामुळे आता प्रेक्षकांना ‘बिग बॉस १९’ची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.