Bigg Boss 19 Ashnoor Kaur : ‘बिग बॉस १९’च्या प्रत्येक आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये वाद आणि एकेमकांवर टीकाटिप्पणी होतच आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या आठवड्यात तान्या मित्तल आणि नीलम गिरी यानी अशनूर कौरचे वय आणि तिच्या शरीराबद्दल टीका केली. तान्या आणि नीलम यानी अशनूरच्या वय आणि शरीराबद्दल टीका करताना हत्ती, डायनोसॉर तसंच आईसारखी दिसते असं म्हटलं होतं.

वीकेंड का वारमध्ये सलमान खानने या टीकेबद्दल तान्या आणि नीलमवर टीका केली. याबद्दल सलमान दोघींना खडसावत म्हणाला, “तुम्ही दोघींनी तिच्या वजनावर तिला हत्ती, डायनोसॉर म्हटले. तान्या, तू तर म्हणालीस की ती तुझ्या आईसारखी दिसते. आधी अशा टिप्पण्या अनेकदा झाल्या आहेत, पण हे खूपच वाईट आहे.”

यानंतर अशनूरला दु:ख अनावर झाले. स्वत:च्या शरीरातील बदलाबाबत बोलताना अशनूरनं सांगितलं, “किशोरावस्थेत मला शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मी कधीही हे सांगितले नव्हते, पण मला Hormonal Imbalance आहे; तणावग्रस्त परिस्थितीत माझं शरीर सुजतं. किशोरावस्थेत मी अनेक गोष्टी केल्या. मी अनेक दिवस उपाशी राहायचे. शोमध्ये येण्यापूर्वी मी ९ किलो वजन कमी केलं, पण घरात येऊन माझं शरीर पुन्हा सुजलं, कारण तणावग्रस्त परिस्थितीत माझं वजन वाढतं. १४ वर्षांपासून मी जंक फूडला हातदेखील लावला नाही. एखाद्याच्या शरीराबद्दल बोलताना तुला लाज वाटली पाहिजे.”

यानंतर अशनूरनं प्रणित मोरेकडेही तिच्या शारीरिक समस्यांबद्दल आपलं मन मोकळं केलं. ती म्हणाली, “किशोरावस्थेत प्रत्येकाचे शरीर बदलते, कॅमेऱ्यावर तर आपलं शरीर १०-१५ किलो जास्तच दिसतं. एक काळ होता जेव्हा मी फक्त पाणी पित असे. मी स्वत:ला आरशात बघत नव्हती. इतकंच नाही तर मी अनेक मित्र-मैत्रिणींनासुद्धा भेटायचे नाही. ही गोष्ट मी कधीच कुणाशी शेअर केली नाही, आई-वडिलांनाही कधीच काही सांगितलं नाही.”