Bigg Boss Marathi Winner Megha Dhade : चित्रपट तसेच अलीकडच्या काळात ओटीटी माध्यमांचं दिवसेंदिवस वाढणारं स्वरुप पाहता, या सगळ्यातही टीव्हीने आपलं भक्कम स्थान कायम टिकवून ठेवलं आहे. टेलिव्हिजनवर मालिका, विविध कार्यक्रम पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच मालिकाविश्वात आणि छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांसाठी दरवर्षी ‘जागतिक टेलिव्हिजन दिवस’ साजरा केला जातो. या खास दिनाचं औचित्य साधत एका मराठी अभिनेत्रीने टेलिव्हिजनला उद्देशून भावुक पत्र लिहिलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडेने टेलिव्हिजनला उद्देशून खास पत्र लिहिलं आहे. यामध्ये तिने स्वत:च्या अभिनय क्षेत्रातील प्रवासासह टीव्हीवर आपलीच एखादी कलाकृती पाहताना कसा अनुभव येतो याबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा : निक्की-अरबाजची Movie डेट; एकत्र पाहिला शाहरुख खानचा २१ वर्षांपूर्वीचा ‘तो’ चित्रपट, फोटो आला समोर

मेघा धाडेने टेलिव्हिजनसाठी लिहिलं खास पत्र

प्रिय टीव्ही,

नमस्कार! मी मेघा धाडे, तुझी एक छोटीशी चाहती आणि सखी. तू माझ्या घरातली एक वस्तू नाहीस, तर एक खास आणि महत्वाचा सदस्य आहेस. आज मी माझ्या मनातील तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त करताना तुला एक पत्र लिहित आहे. आपल्याला असं कधी बोलताच आलं नाही कारण, तू नेहमी माझ्या घरातल्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपलं जीव व्यतीत करत आला आहेस.

तुझ्यामुळे मला अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. माझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात उपस्थित राहिलास तू. तुझ्यामुळे मी घराघरांत पोहोचले, लहानपणी जिच्याजवळ एक कुटुंब होतं आज तेच कुटुंब शेकडो-करोडो लोकांचं झालंय. एका सामान्य कुटुंबातून आलेली मेघा आज तुझ्या साथीने सर्वांची लाडकी झाली. प्रेक्षकांचं प्रेम आणि समाजामध्ये सन्मान मिळत आहे. त्याच्यासाठी मी तुझी ऋणी आहे. आजही तुझ्या साथीने इतक्या वर्षानंतर जेव्हा मालिकांमध्ये परतायचं ठरवलं तेव्हा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेसारख्या उत्कृष्ट कलाकृतीतून तू मला पुन्हा घरोघरी पोहोचवलंस. तुझ्या माध्यमातून मी अनेक कथा पाहिल्या, विविध पात्रांमध्ये रंगले आणि त्या पात्रांच्या आनंदात, दु:खात, संघर्षात सहभागी झाले. एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मी स्वतःला टेलिव्हिजन स्क्रीनवर पहिल्यांदा पाहिलं होतं तो आनंद वेगळाच होता.

तुझ्या स्क्रीनवर जेव्हा मी उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या कलाकारांना, मालिका, चित्रपट बघते तेव्हा त्यातल्या कलाकारांची, अभिनयाची, प्रशंसा अनेकदा केली आहे. पण, तुझं कौतुक क्वचितच कधी केलं असावं. तुझ्या माध्यमातून मला प्रेक्षकांच्या प्रेमाची अनुभूती मिळते. कधी एकटेपणातही तुझीच साथ असते. तू घरात असताना, प्रत्येक क्षण खास असतो. आपण दोघांनी अनेक आठवणी तयार केल्या आहेत. तुला धन्यवाद देण्यासाठी शब्द कमी पडतील कदाचित, पण तुझ्या उपस्थितीमुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले आहे.

तुझी सखी,
मेघा धाडे.

हेही वाचा : Video: “तुरू तुरू चालू नको…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील पुड्या आणि राजश्रीचा जबरदस्त डान्स, सूर्यादादा म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्रीने नुकतंच ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेत मेघा भैरवी हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.