Utkarsh Shinde Shares Video of Muslim Shopkeeper Speaking Marathi : काही दिवसांपूर्वी मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्द्याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. या भाषावादावर विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. राजकीय, तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी हिंदी सक्तीला विरोध करीत महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती असावी, असा आग्रह धरला होता. काही ठिकाणी हा मुद्दा अजूनही चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी-हिंदीच्या वादावर लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेनेही त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “ज्ञानाची भक्ती करायची असते; सक्ती नाही… मराठी माणूस अन्य अमराठी भाषांचा सन्मान करतो, म्हणजे मायमराठीचा अपमान सहन करेल या भ्रमात राहू नका. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याने पाहुणचार घ्या; घराचा मालक होण्याचा प्रयत्न करू नये” असं म्हटलं होतं.
अशातच आता उत्कर्षने याबद्दल पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्षने जम्मू काश्मीरमधील एका दुकानदाराबरोबरच्या मराठीतील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने असे म्हटलेय, “महाराष्ट्रात मराठी बोलायला काहीना शिकायचंच नाही म्हणे. कोणतीही भाषा माणसे जोडण्यासाठी उदयास येते. पण, काहींना त्यांचा धंदा महाराष्ट्रात करायचा आहे, पैसे इथून कमवायचे आहेत, रोज ट्रेन भरून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात घेऊन यायचे; पण भाषा मराठी शिकायची नाही का?”
त्यानंतर तो असं म्हणतो, “आज काश्मीर श्रीनगरमध्ये ड्रायफ्रूट्सच्या दुकानात गेलो असता. मुंबई? तुम्ही महाराष्ट्रामधून आले का? बसा बसा म्हणत मराठीत संवाद सुरू केला. तोडकं-मोडकं मराठी बोलत आमचे मराठी मन जिंकले. त्या काश्मिरी मुस्लीम बांधवांना कळलं हे भाषेचं महत्त्व. त्याच्या मराठी बोलण्यामुळे दोनच्या जागी १० गोष्टी घेतल्या आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ‘खुदा हाफिज फिर आयेंगे भाई’ म्हणत त्याच्याही भाषेला मान देत तिथून निघालो.”
उत्कर्ष शिंदे इन्स्टाग्राम व्हिडीओ
पुढे तो म्हणतो, “मराठी भाषा आपली नाही; समजून काही माणसं दूर जात आहेत, त्यांना मला हेच सांगायचं आहे. तुम्ही आमच्या मराठीला मान-सन्मान द्या… आम्ही तुमच्या भाषेला मनात स्थान दिलेच आहे. हिंदी मराठी भाई भाई; मग कशाला करायची उगाच लढाई?” ‘काश्मीरमध्ये मराठीचा बोलबाला’ अशी कॅप्शन देत उत्कर्षने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये काश्मिरी दुकानदार उत्कर्षबरोबर “पटकन खाऊन बघा… एकदम चांगलं चांगलं…” असे काही मराठी संवाद बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये उत्कर्षने त्या दुकानदाराशी मराठीत संवाद साधल्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. तर अनेक जण त्या दुकानदाराच्या मराठी संवादाचंही कौतुक करीत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी, “काश्मीरमध्ये मराठी बोलतात; मग महाराष्ट्रात का मराठी बोलू शकत नाहीत”, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.