छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अमृता देशमुखला ओळखले जाते. बिग बॉसच्या घरात असताना अमृता देशमुखचे अभिनेता अक्षय केळकर आणि प्रसाद जवादे या दोघांबरोबर अफेअर असल्याचे बोललं जात होतं. नुकतंच तिने याबद्दल भाष्य केले आहे.
अमृता देशमुख ही बिग बॉसमध्ये असताना अक्षय केळकर आणि प्रसाद जवादेला डेट करत असल्याचे बोललं जात होतं. त्या तिघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र आता पहिल्यांदाच अमृताने त्या दोघांबद्दलही स्पष्ट मत मांडले. अमृता देशमुख हिने नुकतंच ‘प्लॅनेट मराठीवरील ‘त्यानंतर सर्व काही बदललं’ या कार्यक्रमात याबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “माझा पाय सुजला नसता तर…”, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव, म्हणाली “ती गाठ कर्करोगाची…”
“बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी माझ्या बॉयफ्रेंडचा जो आकडा अगदीच शून्य होता. तो तिथे गेल्यानंतर अगदी दोन वैगरे पर्यंत पोहोचला. मला याबद्दल खूपच अगदीच हे अनपेक्षित नव्हतं. माझं अक्षय आणि प्रसाद या दोघांबरोबरही चांगलंच बॉन्डिंग होतं. तिथे मी कोणालाही डेट करत नव्हते. कारण ती तशी जागाच नव्हती. मी तिथे कोणालाही आश्वासन वैगरे दिलं नव्हतं”, असे अमृता म्हणाली.
“तिथे ते दोघेही मित्र होते. प्रसाद आणि अक्षय या दोघांचे स्वभाव पूर्णपणे विरुद्ध आहेत. त्याचमुळे मी एकाबरोबर जो वेळ घालवायचे तो पूर्ण वेगळा होता आणि दुसऱ्याबरोबर जो वेळ घालवायचे तो वेगळा असायचा. ते दोघंही माझे वेगवेगळ्या कारणासाठी चांगले मित्र होते. पण का कोणास ठाऊक, बाकी कोणाशीही माझं तितकं चांगलं बॉन्डिंग झालं नाही”, असेही तिने सांगितले.
आणखी वाचा : “आयुष्यभर कदाचित पल्लवी…” ‘स्वाभिमान’ मालिकेने निरोप घेतल्यानंतर पूजाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“त्यांच्यापैकी कोणीही एखादी मुलगी असू शकली असती किंवा दोन्हीही मुली असू शकल्या असत्या. पण ते तसं झालं नाही. मुली कायमच माझ्याविरोधात खलबतंच करत होत्या, त्यांना माझ्याबद्दल असुरक्षितच वाटतं होतं तर मी काय करु…. पण कुठेतरी प्रसाद हा एकटा होता, म्हणून मी त्याच्याशी जाऊन बोलायचे”, असेही तिने म्हटले.