Bigg Boss या शोमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चा होताना दिसते. आता बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची घराबाहेर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. आता अभिजीत सावंतने एका मुलाखतीदरम्यान बेल वाजली की मी घरात कुठेतरी लपून बसायचो, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाला अभिजीत सावंत?

अभिजीत सावंतने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याचे बालपण, गाण्याची सुरुवात कशी झाली, इंडियन आयडलचा प्रवास आणि करिअर अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. इंडियन आयडलनंतर त्याचा चाहतावर्ग वाढला होता, तर तो अनुभव कसा होता? यावर उत्तर देताना त्याने म्हटले, “इंडियन आयडलमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. बऱ्याचदा असं व्हायचं की लोक थेट घरी यायचे आणि विचारायचे अभिजीत घरी आहे का? याचे प्रमाण वाढल्यावर बेल वाजली की मी घरात कुठेतरी लपून बसू लागलो. आई त्यांना चहा देत असे. ग्रुप यायचे, मंडळे यायची. कधी वाटलं तर भेटायचो. कधी कधी कॉलेजमधील मुली कॉलेज बंक करून भेटायला यायच्या. असं वाटायचं माझं घर नाही म्युझियम होतं, अशी लोकं कधीही भेटायला यायची. इंडियन आयडल जिंकलो त्या दिवशी खूप लोक जमले होते. असं नव्हतं की हा मुलगा जिंकला आहे, आम्ही जिंकलो आहे, आपल्यासारखा मुलगा जिंकला आहे, अशी भावना लोकांमध्ये होती”, असे अभिजीतने या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

हेही वाचा: “निक्कीला काहीच बोललं गेलं नाही…”, विशाखा सुभेदारची तीव्र नाराजी; म्हणाल्या, “किती स्वार्थी असावं?”

‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या पर्वात सहभागी होणाऱ्या १६ सदस्यांपैकी तो एक आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अभिजीतच्या खेळाचे कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकार अभिजीतच्या खेळाचे कौतुक करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील त्याची निक्कीबरोबर असणारी मैत्रीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते. अभिजीत सावंत हा इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा विजेता होता, तेव्हा त्याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते.

बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंतचा खेळ दिवसेंदिवस चांगला होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अभिजीतला अरबाज वाटेल ते बोलत असताना संयम राखत स्वत:ची प्रतिष्ठा जपत उत्तम खेळला, असे म्हणत अभिजीतचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता अभिजीत सावंत बिग बॉसमधील पुढील वाटचाल कशी करणार, निक्की आणि इतर सदस्यांबरोबर त्याची समीकरणे कशी राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच भाऊच्या धक्क्यावर आज रितेश देशमुख कोणत्या सदस्याची शाळा घेणार आणि कोणत्या सदस्याला शाबासकीची थाप देणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.