Dhananjay Powar Reveals Suraj Chavan Wife Name : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झालेला सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सोशल मीडियावर त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्गही आहे. गेल्या काही दिवसांपासून सूरज त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

सूरज चव्हाण लवकरच लग्न करणार असून याबद्दल अंकिता वालावलकरने बातमी दिली होती. काही दिवसांआधीच तिने सूरज चव्हाणच्या गावी भेट दिली आणि यावेळी तिनं सूरजच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला होता. मात्र, हा फोटो शेअर करताना तिने सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा लपवला होता. तेव्हापासून सूरजच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे.

अशातच आता सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव समोर आलं आहे. डीपीदादा अर्थात धनंजय पोवारने सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव जाहीर केलं आहे. सूरजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर एक सुंदर मुलगी असल्याचं दिसत आहे. दोघांनी दाक्षिणात्य लुक केला असून हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

‘हा टाईमपास म्हणून केलेला व्हिडीओ आहे, माझी खरी (होणारी पत्नी) लवकरच दाखवतो’, अशी कॅप्शन देत सूरजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. म्हणजेच सूरज चव्हाणची खरी बायको नाही, हे यावरून सिद्ध झालं आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या होणाऱ्या बायकोला पाहण्याची उत्सुकता अधिक लागली आहे.

सूरज चव्हाणने शेअर केलेला इन्स्टाग्राम व्हिडीओ

सूरजच्या होणाऱ्या बायकोविषयी अजून कोणती माहिती समोर आलेली नसली, तरी तिचं नाव आता जाहीर झालं आहे. धनंजय पोवारनेच ते नाव जाहीर केलं आहे. सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करीत धनंजयने म्हटलंय, “मला माहित आहे. मी बघितलं आहे. थांब आता तुझा फोटो मीच वायरल करणार. थांब तुझ्या छकुलीचा फोटो टाकतो. सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव ‘छकुली’ असं आहे.” धनंजयने सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव छकुली असल्याचं जाहीर केलं असलं तरी सूरजने यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

सूरज चव्हाणच्या व्हिडीओवरील धनंजय पोवारची कमेंट

धनंजय पोवार कमेंट
धनंजय पोवार कमेंट

सूरजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिजीत सावंतनेही “सूरज तुला खूप खूप शुभेच्छा” अशी कमेंट केली आहे. तर ‘छोटा पुढारी’नेदेखील “शेवटी सूरज भाऊनी आम्हाला एक वहिनी आणली. आता लग्न कसं वाजत-गाजत होणार” अशी कमेंट केली आहे. दरम्यान, सूरजने अद्याप त्याच्या लग्नाची तारीख सांगितलेली नाही. पण तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या नव्या घराचं कामसुद्धा आता अंतिम टप्प्यात आलं आहे.