बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून, रविवारी म्हणजेच २८ जुलैला स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. आता पहिल्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी स्पर्धकांची तारांबळ उडताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील पहिला दिवस स्पर्धकांसाठी कठीण जाणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

कलर्स मराठीने प्रदर्शित केलेल्या या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील पाणी बंद असल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्पर्धकांना घरात पाणी नसल्याची जाणीव होते. त्यावेळी ते बिग बॉसला घरात पाणी नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे सांगत आहेत. सगळ्यात आधी अंघोळ करायची असते. त्यासाठी पाणी पाहिजे असतं. पण, घरात पाणी नाहीये बिग बॉस, असे वर्षा उसगांवकर म्हणताना दिसत आहेत. त्यावर आता घरातील पाणी गेले आहे. थोड्याच वेळात सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळेल, असे बिग बॉस म्हणताना दिसत आहे. त्यानंतर सदस्यांच्या चेहऱ्यावर पुढे काय होणार? याची भीती स्पष्टपणे दिसत आहे.

(व्हिडीओ सौजन्य: कलर्स मराठी)

बिग बॉसचे पहिल्या चार पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजेरकर यांनी केले आहे. मात्र, या वर्षी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करीत आहे. यंदाचे पर्व वेगळे असणार असल्याचे याआधीच्या प्रोमोमधून सांगण्यात आले होते. आता बिग बॉसच्या घरात नक्की काय धुमाकूळ होणार? स्पर्धकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार? आणि कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकू शकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करण्यासाठी होकार दिल्यावर ‘अशी’ होती पत्नी जिनिलीयाची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाच्या पर्वामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांसह यूट्यूबवरील प्रसिद्ध चेहरेदेखील दिसत आहेत. १६ स्पर्धकांचा घरात प्रवेश झाला असून, त्यामध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, वर्षा उसगांवकर, इरिना रुडाकोवा, अरबाज पटेल, आर्या जाधव, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण, घनश्याम दरवडे, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले यांबरोबरच बिग बॉस हिंदीच्या १४ व्या पर्वात सहभागी होणारी निकी तांबोळी हे स्पर्धक बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसणार आहेत. अनेक दिवसांपासून या पर्वात कोणते स्पर्धक दिसणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. त्याबरोबरच रितेश देशमुख एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत असल्यानेदेखील चाहत्यांना सूत्रसंचालकाची ही जबाबदारी अभिनेता कशी निभावणार याबद्दल उत्सुकता आहे. आता प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे स्पर्धकांच्या तोंडचे पाणी का पळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.