‘बिग बॉस’च्या घरात बऱ्याच स्पर्धकांमध्ये नाती निर्माण होतात. यातील काही नाती ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आणखी दृढ होतात, तर काही नाती संपुष्टात येतात. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात दोन अभिनेत्यांची मैत्री चांगलीच गाजली. ‘बिग बॉस’च्या घरात असतानाही आणि बाहेरही दोघं एकमेकांच्या नेहमी पाठीशी उभे असलेले पाहायला मिळतात. नुकतीच या दोन जिवलग मित्रांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली. याचा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम आणि विकास पाटीलची ग्रेट भेट झाली. याच निमित्तदेखील खास होतं. १० फेब्रुवारीला विशालचा वाढदिवस होता. याच औचित्य साधून विकासने विशालची खास भेट घेतली आणि त्याचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ विकासने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

विकास पाटीलने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “दिल चाहता है…असेच तुझे वाढदिवस येत राहोत आणि असेच आपण भेटत राहो ( भेटण्यासाठी वाढदिवसाची वाट पाहणं हे काय बरोबर नाय भावा ) पण काही असो मजा आली. काल तुला भेटून, खूप दिवसांनी सगळ्या आठवणी ताज्या झाल्या…असंच छान काम करत राहा आणि लोकांचं मनोरंजन करत राहा…वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख शुभेच्छा…लव्ह यू भावा.”

या व्हिडीओमध्ये विकास विशालचं औक्षण करताना दिसत आहे. तसंच विशाल विकासच्या पाया पडून आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे दोघं मजा करताना दिसत आहेत.

विकासने शेअर केलेल्या या व्हिडीओवर विशाल निकम म्हणाला, “माझ्या भावा थँक्य यू…लव्ह यू…आणि तू काल येऊन माझा वाढदिवस आणखी स्पेशल बनवलास…हां आणि लवकरच सगळे भेटू.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Vishal Nikam Comment
Vishal Nikam Comment

दरम्यान, विकास पाटील सध्या ‘ऑल दि बेस्ट’ नाटकात पाहायला मिळत आहे. त्याच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला विशाल निकम छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये विशाल मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने रायाची भूमिका साकारली असून विशालबरोबर अभिनेत्री पूजा बिरारी दिसत आहे. विशाल आणि पूजाची ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.