Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता. यापैकी पुरुषोत्तम दादा पाटील पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर पडले होते. यानंतर दुसऱ्या आठवड्यात कोण बेघर होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. परंतु, दुसऱ्या आठवड्यात रितेश देशमुखने एक नवीन ट्विस्ट सदस्यांना सांगितला.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून दुसऱ्या आठवड्यात कोणीही बेघर झालं नाही. ‘कलर्स मराठी’ वाहिनी एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आल्याने एकाही सदस्याने घराचा निरोप घेतला नाही. मात्र, दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य तिसऱ्या आठवड्यात सुद्धा तसेच नॉमिनेट राहिले. यानंतर ‘बिग बॉस’ने ५० हजार बीबी करन्सी खर्च करून अभिजीत आणि अरबाज या सदस्यांना पॉवर कार्ड खरेदी करण्याची मुभा दिली होती. यानुसार अभिजीतने पंढरीनाथ कांबळे तर, अरबाजने निक्कीला सेफ केलं. याशिवाय टास्क जिंकल्यामुळे वैभवने घन:श्यामला सेफ केलं आणि अभिजीतला नॉमिनेट केलं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi च्या मोठा ट्विस्ट! घरात उघडणार नवीन खोली; नाव आहे खूपच खास, पाहा प्रोमो
घरातील नवनवीन ट्विस्टमुळे अखेरिस या आठवड्यात योगिता, सूरज, अभिजीत सावंत आणि निखिल दामले हे चार सदस्य नॉमिनेट होते. यांच्यापैकी बेघर कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सूरज चव्हाणचा खेळ आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा पाहता तो या आठवड्यात देखील सेफ असेल. अभिजीत सुद्धा घरात पहिल्या दिवसापासून चांगला खेळ खेळत आहे. तसेच योगिताने उत्तम टास्क परफॉर्म करून सुद्धा या आठवड्यात घरी जायची मागणी केली होती तर, निखिल खेळात म्हणावा तेवढा सक्रिय नाही. त्यामुळे योगिता आणि निखिलवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. आता यांच्यापैकी कोण घरी जाणार हे भाऊच्या धक्क्यावर आज रात्री स्पष्ट होईल. पण, त्यापूर्वी समोर आलेल्या एका प्रोमोमुळे निखिल एलिमिनेट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात नवीन खोली उघडणार असल्याचा प्रोमो शेअर केला आहे. यात रितेश देशमुख स्पर्धकांना ‘भाऊची चक्रव्यूह खोली’ याबद्दल माहिती देत असतो. सगळे सदस्य याबद्दलची माहिती लिव्हिंग एरियातील सोफ्यावर बसून ऐकत असतात परंतु, या सगळ्यात निखिल कुठेही दिसत नाही.

निखिल भाऊचा धक्का सुरू झाल्यावर पंढरीनाथ कांबळेच्या बाजूला बसला होता. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तो कुठेही दिसत नाही. याचा फोटो देखील सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळे या आठवड्यात निखिल बेघर झाला असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी देखील या प्रोमोवर केल्या आहेत.

आता निखिल खरंच एलिमिनेट होणार की नाही हे प्रेक्षकांना आज ( १८ ऑगस्ट) रात्री भाऊचा धक्का प्रसारित झाल्यावर समजणार आहे. निखिलाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘रमा माधव’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. यावेळी त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु, बिग बॉसच्या घरात अभिनेत्याला आतापर्यंत फारशी चमक दाखवता आलेली नाही.