Suraj Chavan Post : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. ‘बिग बॉस’च्या घरात अन्य स्पर्धकांशी संवाद साधताना सूरजने त्याला आयुष्यात कशी मुलगी बायको म्हणून हवी? तिचा स्वभाव कसा असावा याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी सूरजने त्याचा साखरपुडा पार पडत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, या व्हिडीओच्या शेवटी हे सगळं स्वप्न असल्याचं समजतं.
आता सूरजने शेअर केलेली अशीच एक नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गुलीगत किंगने साऊथ इंडियन लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज या फोटोमध्ये एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून पोज देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, सूरजच्या बाजूला उभ्या असलेल्या या मुलीचा चेहरा रिव्हिल करण्यात आलेला नाही. तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा पाहायला मिळतोय. सुंदर साडी, केसात गजरा, हातात चुडा असा लूक या मुलीने केलेला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सूरजने लव्ह इमोजी दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
सूरजचा जवळचा मित्र महेश जगदाळेने या फोटोवर, “तुम्ही सगळे अभिनंदन करू शकता हे स्वप्न नाहीये बरं का…” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे या पोस्टवर सूरजच्या हजारो चाहत्यांनी, “भाऊ आता ऐकत नाही”, “वहिनी आल्या”, “अभिनंदन”, “अखेर जोडी जमली”, “वहिनी कोण आहेत”, “अभिनंदन सूरज दादा”, “कोण आहे ओ सूरज भाऊ सांगा” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.
अभिनेत्याच्या सगळ्याच चाहत्यांनी सूरजचं लग्न ठरलंय असा अंदाज बांधून या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, आता खरंच सूरजचं लग्न ठरलंय? की ही कोणत्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सूरजबरोबर या फोटोत झळकणारी मुलगी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान, बिग बॉस मराठी जिंकल्यावर सूरज केदार शिंदे दिग्दर्शित झापुक झुपूक सिनेमात झळकला होता. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळू शकलं नाही.