Karishma Tanna Firecracker Post : नुकताच राज्यभरासह सगळीकडेच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला. अनेकांनी आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासह हा सण साजरा करत दिवाळीचा सण साजरा केला. फराळाचा आस्वाद घेतला. तसंच फटाकेही फोडले. पण, याच फटाक्यांनी आता सर्वत्र प्रदूषण झालं आहे. दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे फटाके. या प्रदूषणामुळे अनेक जण फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करीत असतात.
अनेक सेलिब्रिटी मंडळी या फटाक्यांच्या आवाजाच्या त्रासाबद्दल आणि प्रदूषणाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत असतात. दोन दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरानं वायू आणि ध्वनी प्रदूषणाबद्दलची पोस्ट शेअर केली होती. अशातच आता आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीनं फटाक्यांच्या त्रासाबद्दलची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री करिश्मा तन्नानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फटाक्यांच्या आवाजानं मुक्या जीवांना होणाऱ्या त्रासाबद्दल मत व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये करिश्मा म्हणते, “सकाळी ६ वाजता फटाक्यांच्या आवाजाने मला जाग आली. जग विश्रांती करत असताना कोणीतरी मोठ्या आवाजात फटाके फोडत आनंद साजरा करत होते. तर मी विचार केला की, आपल्या आसपासची हवा इतकी प्रदूषित झाली आहे, अनेक पाळीव प्राणी मोठ्या आवाजामुळे घाबरून लपत आहेत; तर आपण खरंच सण साजरे करत आहोत का? खरंच हा आनंद आहे?”
यानंतर करिश्मा म्हणते, “आपण आपल्या मुलांना मोठा आवाज म्हणजे आनंद, धूर म्हणजेच उत्सव साजरे करणं, मुक्या प्राण्यांना घाबरवणं आणि स्वत:लासुद्धा धुराचा त्रास करून घेणं हे शिकवतोय का? मुक्या जीवांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या आणि सर्वत्र धूर पसरवणाऱ्या फटाक्यांपेक्षा आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवणं, दिवे लावणं आणि स1गळीकडे आनंद पसरवणं म्हणजे सण साजरा करणं ही जाणीव त्यांच्यात निर्माण केली तर…”
यापुढे ती पोस्टद्वारे चाहत्यांना आवाहन करीत म्हणते, “चला आपण अशी पिढी बनूयात, ज्या पिढीसाठी सण साजरा करण्याचा आनंद म्हणजे प्रकाश आणि शांतता पसरवणं आहे, ना की प्रदूषण करणं. ही पोस्ट उशिरानेच पोस्ट केलीय, पण काय करू? हे फटाके थांबतच नाहीयेत आणि पोस्ट शेअर करणं मला गरजेचं वाटलं.” दरम्यान, या पोस्टसह करिश्मानं #SayNoToCrackers #ForOurPlanet #CompassionisFestive #BeTheChange हे हॅश टॅगदेखील दिले आहेत.
करिश्मा तन्नाने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

करिश्मा तन्ना हिंदीतल्या काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मधील इंदू म्हणून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर ‘पलकी’, ‘नागिन ३’ आणि ‘कयामत की रात’सारख्या मालिकांमुळे तिला लोकप्रियता मिळाली. तसंच तिनं ‘बिग बॉस ८’ आणि ‘खतरों के खिलाडी १०’सारखे काही शोदेखील केले आहेत. इतकंच नव्हे तर तिनं ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी करिश्मा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तसंच अनेक विषयांवर ती तिची मतं स्पष्टपणे मांंडताना दिसते. अशातच तिनं फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
