‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे डॉ. निलेश साबळे घराघरांत लोकप्रिय झाला. एक दशकाहून अधिक काळ हा अभिनेता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. निलेश राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची हुबेहूब मिमिक्री करतो. आजवर पार पडलेल्या बहुतांश पुरस्कार सोहळ्यांमध्ये निलेश साबळेने राजकीय नेत्यांची मिमिक्री केल्याचं पाहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मिमिक्री पाहून एके दिवशी अचानक राज ठाकरेंचा फोन आल्याचा किस्सा सांगितला.
निलेश साबळे ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “हा किस्सा बऱ्याच लोकांना माहीत आहे. आम्ही पुरस्कार सोहळ्यात बऱ्याचदा स्किट सादर केलेत. तेव्हा मी एकदा राज साहेबांची नक्कल सुद्धा केली होती. ते शूटिंग सकाळपर्यंत सुरू होतं आणि मी घरी येऊन झोपलो होतो. साधारण दुपारी एक-दीडच्या आसपास मी फोन पाहिला… तेव्हा मला अनेक मिस कॉल आल्याचं मोबाइलमध्ये दिसलं. जवळपास साहेबांचे १७ मिसकॉल आले होते, माझ्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा आहे. मला कळेना हा नंबर नेमका कोणाचा आहे. त्यानंतर मला आणखी एक फोन आला आणि मी तो उचलला, मला समोरून आवाज आला… झोपलाय का? नंतर करू का फोन? मी विचारलं कोण बोलतंय? ते समोरून म्हणाले राज ठाकरे बोलतोय.
निलेश पुढे म्हणाला, “मला काही क्षण असं वाटलं की, साहेब मला का फोन करतील? मला सुरुवातीला असं वाटलं की आमच्यातला कोणीतरी मित्र माझी मजा घेतोय. कोणीतरी आवाज बदलून बोलत असेल. पण, साहेब पुढे म्हणाले, मला अमेय खोपकरांनी तुमचा व्हिडीओ दाखवला. आता अमेय खोपकरांचं नाव आल्यावर मी लगेच अलर्ट झालो की, खरंच साहेबांचा फोन असेल कारण, मागून अमेय सरांचा आवाज सुद्धा येत होता हे मला जाणवलं. साहेब मला म्हणाले, तुम्ही उशिरा शूटिंग करून आलात असं मला समजलंय त्यामुळे आता तुम्ही झोपा आपण नंतर बोलू…मला नंतर फोन करा.”
“मी त्यांना विनंती केली साहेब तुम्ही बोलू शकता त्यावर ते म्हणाले होते, मला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. मला सगळ्या टीमला भेटायचं आहे तुम्ही कधी याल? त्यानंतर आमचं पुढच्या दोन दिवसांत भेटायचं ठरलं. आमची संपूर्ण ‘चला हवा येऊ द्या’ची टीम त्यांच्या घरी गेली होती. राजकारण वगैरे बाजूला राहिलं. फक्त विनोद या एका विषयावर आम्ही जवळपास दोन ते अडीच तास बोलत होतो. त्यांनी सुद्धा अनेक किस्से सांगितले, एक वेगळे राज ठाकरे यानिमित्ताने आम्हाला अनुभवता आले. त्यानंतरही एक-दोन वेळा आमची भेट झाली. त्यांनी स्वत:हून कौतुक केलं होतं, खरंच मला तेव्हा छान वाटलं होतं.” अशा भावना निलेश साबळेने व्यक्त केल्या.