Chala Hawa Yeu Dya New Season : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं नवीन पर्व आजपासून ( २६ जुलै ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा या शोमध्ये गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे कलाकार गँगलीडर्सच्या भूमिकेत झळकतील. शोचा पहिला भाग ऑन एअर होण्यापूर्वी या कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाला खूप प्रेम द्या अशी विनंती प्रेक्षकांना केली आहे.
अभिनेत्री श्रेया बुगडे पोस्ट शेअर करत लिहिते, “चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं नवीन पर्व येणार असं कळताच सगळीकडे खूप उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘हवा यऊ द्या’चं पाहिलं पर्व २०१४ ते २०२४ असं तब्बल १० वर्षे सुरु होतं. लेखक, दिग्दर्शक, सगळे कलाकार, तंत्रज्ञ ,पडद्यामागे काम करणारे कलाकार आणि आमची चॅनेलची सगळी टीम यांनी जीवाची परकाष्ठा करून पण अत्यंत आनंदाने या कार्यक्रमात काम केलं. मायबाप प्रेक्षकांनी सुद्धा आमच्यावर जीव ओतून प्रेम केलं. ‘चला हवा येऊ द्या’ जेव्हा २०१४ साली सुरु झालं तेव्हा तो सुद्धा एक नवीन कार्यक्रम होता… त्या आधी मराठी टीव्हीवर कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे तेव्हा सगळेच चाचपडत होतो.”
नवीन -जुने सवंगडी घेऊन तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न…
श्रेया पुढे म्हणाली, “प्रेक्षकांनी पण सुरुवातीला थोडा वेळ घेतला आणि मग भाग दर भाग आम्ही त्यांच्या घरातच नाही तर त्यांच्या, मनात सुद्धा कायमचं ‘घर’ केलं. तेव्हा सुद्धा आम्ही कधी चुकलो तर वेळोवेळी तुम्ही कान पकडले आणि तशीच कायम शाब्बासकीची थाप सुद्धा दिलीत. आता ‘हवा येऊ द्या’चे नवीन पर्व नाही तर नवा अध्याय सुरु होतोय. यावेळी पण तशीच मेहनत घ्याची तयारी आहे. तुम्हा प्रेक्षकांना न दुखवता फक्त तुमचं मनोरंजन करण्याचा हेतू आहे. यावेळी यात काही नवीन -जुने सवंगडी घेऊन आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.”
“त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून निवडून आणलेले काही नव्या विनोदाची शैली आणि नवीन उमेद घेऊन आलेले तरुण सुद्धा त्यांना मिळालेल्या या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्याही डोळ्यात तिच स्वप्न आहेत जी आमच्या होती. माझी खात्री आहे की या सगळ्या आमच्या पोरांना आणि आम्हाला सुद्धा तुम्ही तेच प्रेम आणि आशीर्वाद द्याल जे इतकी वर्ष देत आलात! फक्त यावेळी कार्यक्रम पाहताना ‘आपला आवडता कार्यक्रम परत आलाय…’ या एकाच भावनेनं बघा. बस्स! या नवीन पर्वाला पण तुम्ही तेवढच प्रेम द्याल हीच देवाचरणी आणि तुमच्या पुढे प्रार्थना…भेटूच….खूप प्रेम!” असं श्रेयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, श्रेयाच्या या पोस्टवर मराठी सिनेविश्वातील कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.